आमदार किशोर पाटील यांच्या सांगण्यावरूनच हल्ला : जखमीचा आरोप
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने पाचोरा : येथील भडगाव – पाचोरा मतदारसंघाचे आमदार तथा शिंदे गटाचे नेते किशोर पाटील यांच्याकडून थेट धमकी मिळालेल्या पत्रकाराला बुधवार दि. ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी वार्तांकन करून परतत असताना अज्ञात गुंडांनी नगरपालिकेसमोर भर रस्त्यावर दुचाकीवरून पाडत त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावरून पाचोरा पोलीस स्टेशनला पत्रकार संदीप महाजन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप महाजन हे पाचोरा शहरात पत्रकारिता करतात. त्यांच्या परिवारासह पाचोरा शहरात राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. त्यावेळी किशोर पाटील यांनी वाईट वाटून त्यांना फोन करून शिवीगाळ करीत धमकी दिली होती. तसेच शिवीगाळ केल्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर कबूलही केले होते. या घटनेनंतर मात्र पाचोरा शहरात संमिश्र पडसाद उमटले होते. संदीप महाजन यांनी पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी करत आमदार किशोर पाटील यांच्यापासून स्वतःला व कुटुंबीयांना धोका असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण देण्यात आले नव्हते.
बुधवारी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असताना महानगरपालिकेसमोर अज्ञात गुंडांनी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकत दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली. आमच्या किशोर आप्पाच्या नादी यापुढे लागलास तर याद राख अशी धमकी त्यांना गुंडांनी दिली.
या घटनेनंतर घाबरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान यामुळे पत्रकारांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पत्रकारांच्या संघटनांनी देखील पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. एखादे वृत्त आवडले नाही म्हणून शिवीगाळ करणे, त्यानंतर, होय मीच शिवीगाळ केली म्हणून कबुली देखील देणे, त्यानंतर आमदाराचे नाव घेऊन अज्ञात गुंडांनी त्या पत्रकाराला मारहाण करणे हा सर्व घटनाक्रम पाचोराच नव्हे तर जळगाव जिल्ह्यासाठी खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया आता जनमानसातून उमटत आहेत.