अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशात दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू निपजू नये याचे दुख: आजवर अनेकांकडून व्यक्त केले गेले.
सध्या भारतीयांचा आवडता क्रीडाप्रकार म्हणजे क्रिकेटचा विश्वचषक नुकताच सुरु झाला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या लोकप्रियतेला सध्या तशी ओहोटीच लागलेली आहे परंतु आता सर्व बलाढ्य संघ समोरासमोर येणार असल्याने हळूहळू चाहत्यांच्या कैफाला देखील जोर चढू लागला आहे. विश्वचषकातील सलामीचा सामना प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे तसा चर्चेत राहिला परंतु कालच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता क्रिकेटप्रेमींना अनेक चुरशीच्या सामन्यांची मेजवानी पुढे बघायला मिळेल ही अपेक्षा!
परंतु सध्या क्रिकेट विश्वचषक जरी चर्चेचा विषय असला तरी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आजवरचे सर्वोच्च यश मिळवले तो आहे. तर रविवारी एकीकडे भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया सोबत दोन हात करत होता तेव्हा तिकडे आपला शेजारी असलेल्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोपाचा दिमाखदार सोहळा सुरु होता. विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेमध्ये भारताने आजवरची सर्वोच्च अशी १०७ पदकांची कमाई केली. तेव्हा भारतीयांच्या दृष्टीने ही एक गौरवाची बाब आहे. भारतात तसे क्रिकेट वगळता इतर खेळ हे दुर्लक्षितच राहिले होते. मात्र आता काळ बदलतो आहे आणि नीरज चोप्राच्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये केलेल्या सुवर्ण कामगिरीनंतर अनेक क्रीडाप्रेमी आता इतर खेळांमध्ये देखील रस घेऊ लागले आहे. अर्थात हे खेळाडूंच्या दमदार कामगिरीचे यश आहे.
भारतीय क्रीडापटूंनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली यामागे अनेक पैलू आहेत. प्रथम म्हणजे आपला देश म्हणजे भारत आता जागतिक स्तरावर जी काही आश्वासक पावले टाकतो आहे त्यामध्ये क्रीडा हा विषय देखील खूप महत्त्वाचा आहे. जागतिक प्रभाव निर्माण करण्यासाठी केवळ आर्थिक महाशक्ती होऊन भागत नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण करून जागतिक पटलावर आपण आपले स्थान निर्माण करणे आवश्यक असते. त्यासाठी अमेरिका आणि चीन यांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. ऑलम्पिक स्पर्धामध्ये अमेरिका आणि अलीकडे चीन यांची घोडदौड आपण सातत्याने बघतो आहोतच. तेव्हा महाशक्ती म्हणून जर जागतिक स्तरावर आपल्याला आपला ठसा उमटवायचा असेल तर क्रीडा क्षेत्रातील कामगिरी हा त्याचा एक परिमाण म्हणून गणला जातो. इतकेच काय तर अभ्यासकांनी देशाची आर्थिक प्रगती आणि क्रीडा क्षेत्राच्या कामगिरीचा मार्ग हातात हात धरून जातो हे विश्लेषण करून दाखवून दिले आहे. तेव्हा आपण देखील या आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशाकडे केवळ क्रीडा स्पर्धेचे यश म्हणून न पाहता एका व्यापक दृष्टीकोनातून पाहत आपल्याकडे असलेल्या संधीचा आराखडा मांडला पाहिजे.
क्रीडा क्षेत्रातील यश क्रीडा क्षेत्राच्या पलीकडे देखील कसे महत्त्वाचे आहे हे तर माहीत झाले. पण क्रीडा क्षेत्रात ज्या खेळाडूंनी आपल्या सरस कामगिरीच्या जोरावर हे अभूतपूर्व यश मिळविले त्यांच्या कामगिरीविषयी देखील चर्चा झाली पाहिजे. अविनाश साबळे, ओजस देवतळे यांसारख्या मराठी खेळाडूंनी देखील या स्पर्धांमध्ये चोख कामगिरी बजावली. बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारत तसा आजवर मागेच राहिला आहे. अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशात दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू निपजू नये याचे दुख: आजवर अनेकांकडून व्यक्त केले गेले. मात्र क्रीडा स्पर्धेतील यशाचे गणित केवळ अगडबंब लोकसंख्येच्या भरवशावर अवलंबून नसते. तर खेळाडूंना त्यासाठी आंतराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. आजवर आपण त्यासाठी प्रयत्न केले तरी ते जागतिक महाशक्ती असलेल्या देशांच्या तुलनेने तोकडे होते. अलीकडे त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते आहे.
चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांनी खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे त्याचाच परिपाक म्हणून हे देश जागतिक स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करतांना दिसतात. आपण म्हणजे भारताने या आशियाई क्रीडा स्पर्धेत नक्की चांगले यश मिळवले पण उपरोक्त उल्लेख केलेल्या देशांच्या तुलनेत आपण नक्की कोठे आहोत हे देखील बघितले पाहिजे. तर यजमान चीनने २०१ सुवर्ण पदकांसह एकूण ३८३ पदके मिळवत आपला दबदबा कायम राखला. तर जपानने ५२ सुवर्ण पदक मिळवत १८८ पदके आपल्या खात्यात जमा केली. तर ४२ सुवर्ण पदकांसह १९० पदके मिळवत दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारताने चौथे स्थान पटकावले ज्यात भारताला २८ सुवर्ण, ३८ रजत आणि ४१ कांस्य पदक मिळालीत. यावरून आपल्या यशाचा आनंद साजरा करतांना आपल्याला अजून किती मजल गाठायची आहे याची कल्पना येते. अर्थात याआधी आपण पहिल्या पाचात देखील नव्हतो हे पण लक्षात घेतले पाहिजे.
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्याला जे यश मिळाले त्यात केंद्र सरकारच्या कामगिरीची सुद्धा दाखल घेतली जायला हवी. सरकारी हस्तक्षेप असला की जो काही सावळा गोंधळ असतो तो या अभियानात दिसला नाही ही सर्वात पहिली जमेची बाजू म्हणता येईल. “अब की बार सौ के पार” असा दणदणीत राजकीय नारा आठवावा असा नारा देऊन सरकारने खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा चंग बांधला होता. त्यात त्यांनी यश देखील मिळवले. क्रीडा संघटनांमध्ये असलेल्या भोंगळ कारभाराचा फटका खेळाडूंना बसू नये इथपासून ते त्यांना योग्य प्रशिक्षक आणि प्रशिक्षण मिळेल याची काळजी सरकारने घेतली. याशिवाय चांगल्या पायाभूत सुविधा, खुराक यांसह बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने सरकारने आशियाई क्रिडा स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राबवलेल्या अभियानाला चांगलेच यश मिळाले.
पुढील वर्षी ऑलम्पिक स्पर्धा देखील आहे. आशियाई स्पर्धांमध्ये आपला डंका वाजविल्यावर आता जागतिक स्तरावर देखील आपल्याला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतातील प्रतिभावान खेळाडू या अपेक्षांना नक्कीच पात्र ठरतील. त्यांचे लक्ष आता त्यासाठी केंद्रित होईलच तोवर सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यांचे मिळवलेल्या यशासाठी हार्दिक अभिनंदन!