अमली पदार्थ जे तरुणांच्या जीवनाला पार उध्वस्त करू शकतात अशा क्षेत्रात जर राजकारण्यांचा सहभाग आढळत असेल तर त्याची चिंता सामान्य जनतेने करू नये का?
अमली पदार्थांची तस्करी आणि निर्मितीच्या गुन्ह्यातील आरोपी ललित पाटील याचे नाव आता सर्वांनाच माहिती आहे. त्याने केलेले कारनामे जसजसे उघड होता आहेत तसे ‘व्यवस्था’ म्हणून ज्यावर आपण सामान्यजन अवलंबून आहोत तिचे नागडे रूप समोर येते आहे. आधी पुण्यातील ससून रुग्णालयातून पलायन करण्यात यशस्वी झालेल्या ललिताला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या परंतु तोपर्यंत याप्रकरणी पोलिस प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासन यांची अब्रू पार वेशीला टांगली गेली.
सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार ३०० कोटी रुपयांचे असलेले हे अमली पदार्थ तस्करीचे हे जाळे आता मोठ्या प्रमाणावर फोफावले असेल असा कयास व्यक्त केला जातो आहे. आधी केवळ तस्करी पुरता मर्यादित असलेले हे अमली पदार्थांचे जाळे नंतर थेट अमली पदार्थांच्या निर्मिती पर्यंत गेले यावरूनच आपली सार्वजनिक व्यवस्था किती अपयशी ठरली हे लक्षात येते. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील च्या मुसक्या आवळल्यानंतर त्याने आपण याप्रकरणी आपल्याशी कोण कोण संबंधित आहे हे उघड करू असे सांगितल्याचे दूरचित्रवाणीच्या पडद्यावर जनतेने बघितले. म्हणजे यांत बरीच बडी धेंड गुंतलेली आहेत हे नेहमीसारख सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत आहे.
तरुणाईला व्यसनाधीन करून त्यांचे अवघे जीवन उध्वस्त करणारा हा अमली पदार्थांचा गोरखधंदा आता किती खोलवर रुजला आहे हे यानिमित्ताने समोर आले. तसेच या प्रकरणात सर्वात वाईट कुठली बाजू असेल तर ती म्हणजे राजकारण्यांचा या प्रकरणाशी असलेला संबंध हा आहे. सध्या आरोप प्रत्यारोपांचा जो खेळ सुरु आहे त्याकडे बघितले तर एकाच लक्षात येते ते म्हणजे राजकारण्यांचा या प्रकरणात निश्चित सहभाग आहे. जेव्हा व्यवस्था एका आरोपीची रुग्णालयात एवढी बडदास्त ठेवते तेव्हाच खर तर हे निष्पन्न झालं आहे की राजकीय आश्रय, गुन्हेगारी विश्वातील लोकांशी असलेले लागेबांधे आणि पोलिसांची साथ मिळाल्यानेच ललित पाटील एवढा आपल्या गोरखधंद्याचा विस्तार करू शकला.
पैसे कमविण्यासाठी राजकारण आणि राजकारण टिकविण्यासाठी पैसा हा सुरु झालेला झालेला खेळ यानिमित्ताने कोणत्या थराला गेला आहे हेच लक्षात येते. सरकारी निधीत भ्रष्टाचार करून आपल्या तुंबड्या भरणारे राजकारणी आता चांगले म्हणावे इतकी दयनीय अवस्था आपली झाली आहे. कुठलाही विधिनिषेध न बाळगता आपल्याला जणू आपले साम्राज्य निर्माण करायचे आहे या थाटात राजकारणी सर्व व्यवस्थेचा पार विचका करतांना दिसत आहे. अमली पदार्थ जे तरुणांच्या जीवनाला पार उध्वस्त करू शकतात अशा क्षेत्रात जर राजकारण्यांचा सहभाग आढळत असेल तर त्याची चिंता सामान्य जनतेने करू नये का? वाममार्गाने पैसा आला की तो कशाही पद्धतीने उधळायला हे लोकं तयार असतात आणि त्यातूनच हे आपला बटिक असा पाठीराखा वर्ग तयार करतात. जिथे तिथे यांचा वावर सुरु झाला की, आपल्याशिवाय काही पर्याय नाही. आपण सांगू ती पूर्व दिशा या पद्धतीने हे वागू लागतात. इतकेच काय? मोठमोठाले अधिकारी देखील त्यांच्या हो ला हो मिळवतात आणि मग आपल्याला विचारणारच कोण आहे या थाटात या लोकांचे वागणे सुरु होते.
जर व्यवस्थेच्या आशिर्वादानेच असले अवैध धंदे सुरु राहतील तर मग या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? आधी एक सांगितले जायचे की एखादा सडका आंबा असतो. परंतु तो भ्रष्ट अधिकारी म्हणजे काही व्यवस्था नाही. पण आता खरच तशी परिस्थिती राहिली आहे का? सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतो. राजकारण्यांना तर काय आपल्या सोबत असले उमदे हात हवेच असतात. व्यवस्थेतील अथवा गुन्हेगारी क्षेत्रातील लोकं हेरायचे, त्यांना अभय द्यायचे आणि नाकातोंडाशी पाणी आले की त्यांना पुढे करून आपली कातडी वाचवायची हा राजकारणाचा आकृतीबंध आता व्यवस्थेचा घास घेऊ लागला आहे.
सामान्यांनी चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून आधी खाजगी रुग्णालय गाठले नंतर आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून खाजगी शाळेचे अगडबंब शुल्क पदरमोड करत भरायला सुरुवात केली. आता आपला पाल्य वाईट मार्गाला लागू नये म्हणून त्याने खाजगी सुरक्षा पण द्यावी का? सरकारची काहीच जबाबदारी नाही का? जर पोलिसच गुन्हेगारांना मदत करत असतील आणि राजकारणी देखील यांत सामील असतील तर सामान्यांनी सुरक्षित जीवन जगावे तरी कसे? या सर्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की हे सर्व आपल्या मुळाशी एक दिवस येणार आहे. राजकारण्यांवर जर जनतेचा वचक राहिला नाही तर आता जे सुरु आहे ते असेच सुरु राहील किंबहुना उघडपणे सुरु राहील. तेव्हा राजकारणाचा जो उकिरडा झाला आहे तो स्वच्छ झाला नाही तर यातून जी रोगराई पसरेल त्याला आपण अटकाव करू शकणार नाही हेच खरे!