गेल्यावर्षी देशभरात दररोज ४६१ जणांनी आपला जीव अपघातात गमावला. तासानुसार सांगायचे तर दर तासाला १९ मृत्यू हे अपघातांमुळे झाले.
आपल्याकडे रोज इतके सारे अपघात होत असतात त्याविषयी सातत्याने बोलले जाते तरी अपघात कमी होण्याचे काही चिन्ह दिसत नाही. देशभरात वाढते अपघात हे काळजीचे कारण आहे. सध्या हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे त्याला कारण म्हणजे वाहतूक मंत्रालयाने रस्ते अपघातांच्या संदर्भात प्रसृत केलेला अहवाल हे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अहवाल प्रसिद्ध झाला मात्र त्यातून आपण म्हणजे व्यवस्था आणि जनता काय धडा घेते; तर काहीच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.
अपघात झाले की तात्पुरता काहीतरी मलमपट्टी करावी हा उद्योग आपण वर्षानुवर्षे पाहतो आहोत. तेवढ्यापुरता मर्यादित न राहता या प्रश्नावर जर आपण युध्दपातळीवर प्रयत्न केले नाही तर ही अपघातांची कधीही न संपणारी मालिका आपले कधीही न भरून निघणारे नुकसान करेल. अर्थात हे सर्वांना कळते मात्र उत्तर शोधायचा आपला आवाका कमी पडतो आहे. रस्ते अपघातांच्या संदर्भात ताजा अहवाल काय सांगतो हे जर आकडेवारीच्या स्वरूपात समजून घेतले तर त्यामागे असणारे भीषण असे चित्र आपल्यासमोर येते आणि मन सुन्न होते.
देशभरातील अपघातांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास तर गतवर्षात ४ लाख ६० हजारांपेक्षा अधिक अपघात झाले. त्यात १ लाख ६८ हजार ४९१ जणांनी जीव गमावला. म्हणजे अधिक उलगडून सांगायचे झाल्यास गेल्यावर्षी देशभरात दररोज ४६१ जणांनी आपला जीव अपघातात गमावला. तासानुसार सांगायचे तर दर तासाला १९ मृत्यू हे अपघातांमुळे झाले. वर नमूद केलेला आकडा हा मृत्यूंचा आहे. जखमींची संख्या ४ लाख ४३ हजार ३६६ इतकी आहे. २०२१ या वर्षाच्या तुलनेत २०२२ मध्ये १२ टक्के अधिक अपघात झाले आणि ९.४ टक्के जास्त मृत्यू झाले त्याचबरोबर १५.३ टक्के जखमींची संख्या वाढली. झालेल्या एकूण अपघातांपैकी ३५ टक्के अपघात हे द्रुतगती महामार्गांवर तर ३३ टक्के अपघात हे राष्ट्रीय महामार्गांवर झालेले आहेत.
अपघात हा विषय आला की आपल्या डोळ्यासमोर केवळ प्रवासी वाहने, जड वाहने आणि मोटारगाड्या यांच्या छिन्नविछिन्न सांगाड्यांचे चित्र उभे राहते. मात्र झालेल्या एकूण अपघातांपैकी जास्त अपघात हे दुचाकींचे आहेत. शिवाय अपघातात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ७४ हजार ८९७ जण हे दुचाकी अपघातातील मृत्यू आहे. टक्केवारीत सांगायचे झाल्यास एकूण अपघाती मृत्यूंपैकी ४४.४५ टक्के मृत्यू हे दुचाकी अपघातात झाले आहे. गेल्यावर्षी पेक्षा हे प्रमाण देखील अधिक आहे.
अपघात झाले की वेळोवेळी त्यामागची कारणे समोर होऊन सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली जाते. या वाढत्या अपघातांची जबाबदारी सरकारची निश्चित मोठी आहे. परंतु अहवालातील आकडेवारी हे देखील दर्शवते की अनेक अपघात हे टाळता येऊ शकतील या श्रेणीतील होते. तब्बल ७१ टक्के अपघात हे वेगावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे झाले ही बाब डोळ्याआड करता येणार नाहीत. शिवाय एकूण मृत्यूंपैकी ९०९४ जणांनी उलट दिशेने गाडी चालवतांना आपले प्राण हकनाक गमावले. ४२०१ जण दारूच्या नशेत गाडी चालवतांना मृत्यू पावले. ३३९५ जणांनी गाडी चालवत असतांना मोबाईल वर बोलतांना मृत्युला आमंत्रण दिले. याचबरोबर १४६२ जण वाहतूक सिग्नल न पाळता गाडी दामटली म्हणून परलोकी गेले. थोडक्यात काय वाहतूक शिस्तीचे धडे गिरवले नाही तर ते आपल्या जीवावर बेतू शकते हे सामान्यांनी आपल्या मनावर कोरून ठेवायला हवे.
एकंदरीत अपघातांच्या समस्येविषयी केवळ सरकारकडे बोट दाखवून सामन्यांची जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी आपल्याला देखील स्वयंशिस्तीचे धडे आत्मसात केले पाहिजे. जगाचा विचार करता आपली वाहनसंख्या जगाच्या तुलनेत अवघी २ टक्के आहे मात्र आपल्याकडे होणारे अपघात हे जगात एकूण होणाऱ्या अपघातांच्या ११ टक्के आहेत. तेव्हा देशव्यापी समस्या म्हणून आपण अपघतांकडे पाहणार आहोत की नाही? राज्य पातळीवर बघितल्यास चेन्नईने अपघातांचे प्रमाण ४९ टक्के कमी करत आपण त्याबाबतीत सजग असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. मुंबई देखील अल्पशी घट दाखवत अपघातांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतांना दिसते आहे. परंतु याबाबतीत आपल्याला मोठा पल्ला गाठणे गरजेचे आहे. अपघात होणाऱ्या शहरात दिल्ली प्रथम तर बंगळूरू द्वितीय स्थानावर आहे. याबाबतीत कठोर उपाययोजना आपण केल्या नाहीत तर अपघातांचा हा भस्मासुर किती कुटुंबांची राखरांगोळी करेल याची गणती करता येणार नाही.
भारतीय म्हणून सार्वजनिक अवकाशात आपल्याला चांगल्या कामगिरीची गरज आहे हे स्पष्ट आहे. सरकार पायाभूत सुविधा द्यायला कमी पडते म्हणून सामान्य देखील तो प्रश्न आपल्या वकुबाप्रमाणे सोडवायला बघतात. अलीकडे सर्वत्र रस्त्यांवरील अतिक्रमणे देखील इतकी वाढली आहेत की पादचाऱ्यांनी चालावे कुठे हा प्रश्न आहे. देशभरात झालेल्या अपघातांमध्ये सव्वा लाख पादचारी जायबंदी व्हावे यांतून आपण काय ते समजावे. आपला देश हा झपाट्याने प्रगती करतो आहे मात्र जर या अपघातात १६ ते ६० वयोगटातील नागरिक आपला जीव हकनाक गमावत असतील तर हे देशाच्या संपत्तीचे नुकसान नाही का? वाहतूक मंत्रालयाचा आलेला अहवाल चिंताजनक आहे त्याचा उहापोह केवळ चर्चाविश्वात न होता प्रत्यक्ष जमिनीवर काही अनुकूल घडले तर हकनाक जाणारे जीव वाचू शकतील अन्यथा किड्यामुंग्यांचे जगणे भाळी असलेली जनता तशीच मृत्युच्या दारी पोहोचेल.