DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- जयेश जाधव
रायगड :- ऑगस्ट महिन्यापासून कर्जत, नेरळ, खोपोली परिसरात अचानक विद्युत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या कॉईल चोरण्याचा घटनांत वाढ झाली होती. यामुळे महावितरणचे मोठे नुकसान होत असतानाच या अज्ञात चोरटयांनी पोलिसांना देखील थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या चोरट्याने पकडण्याचा नेरळ पोलिसांनी देखील चंग बांधला होता. दरम्यान या प्रकरणात चोरट्यांना जेरबंद करण्यात नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या सह पोलीस पथकाला यश आले असून ७ लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. नेरळ पोलिसांच्या या धडक कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ, कर्जत, खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्ट २०२३ पासून विद्युत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या कोईल चोरीचे सत्र सुरु झाले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीची तसचे खाजगी मालकी असलेले विद्युत ट्रान्सफॉर्मर कोणत्यातरी हत्याराने खोलुन त्यामधील ऑईलचे नुकसान करत त्यातील तांब्याची कोईल चोरून नेत होते. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे ३ कर्जत पोलीस ठाणे येथे ४ तर खोपोली पोलीस ठाणे येथे १ गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या चोरट्यांचा नेरळ पोलिसांनी बंदोबस्त करण्याचा निश्चय करत तपासाला सुरुवात केली. याकरिता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत विजय लगारे, उपविभागिय पोलीस अधिकारी खालापुर विक्रम कदम यांनी आदेशीत केल्याप्रमाणे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह तपास पथक तयार केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, लिंगप्पा सरगर, नितीन मंडलीक, सहा.फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे, पोलीस शिपाई निलेश कुमरे, विनोद वांगणेकर यांचा त्यात समावेश होता.
दाखल गुन्हयातील अज्ञात चोरटयांचा शोध घेण्याकरीता वरीष्ठांच्या आदेशप्रमाणे तयार करण्यात आलेल्या पथकातील श्रीरंग किसवे यांना गोपनिय बातमीदारांमार्फत नेरळ परीसरांत एक संशयित आढळून आला. त्यानुसार आवेश आस्लम खान, वय-२० रा.जिते सिमा लॉन्स हॉटेल जवळ मुळ रा.पिंपरा पोस्ट, मोहनकोला,ता.सोहरातगढ, जिल्हा-सिद्धार्थनगर, राज्य-उत्तरप्रदेश यांस चौकशी कामी पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. याबाबत नेरळ पोलिसांनी त्याकडे कसून चौकशी केली असताना त्याने सदर गुन्हयाची कबुली देवून त्याचे आणखी दोन साथीदार शहजाद आब्बास खान व आशपाक आब्बास खान रा.राजेंद्रगुरूनगर, नेरळ, ता.कर्जत, मुळ रा.सिद्धार्थनगर, राज्य-उत्तरप्रदेश,यांनी मिळुन सदर गुन्हे केल्याची कबुली दिली. यासह त्यांनी सदर गुन्हे करताना लाल रंगाची मारूती स्वीफ्ट गाडी क्रमांक एम.एच.१२ सी.वाय.७४२९ हि घेऊन त्यात स्क्रु ड्रायव्हर, पक्कड, हातोडी अशी हत्यारे वापरून काॅईल चोरी केल्याचे सांगितले.
यातील आवेश आस्लम खान यांस दिनांक ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेली असुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडुन ३ लाख ३ हजार रूपये किंमतीची ५०५ किलो ग्रॅमची तांब्याची तार, अंदाजे ४ लाख रूपये किमतीची मारूती कंपनीची स्वीफ्ट गाडी, गुन्हयात वापरलेले हत्यार स्क्रु ड्रायव्हर, पक्कड, हातोडी आदी जप्त करण्यात आले आहे. तर या प्रकरणातील २ आरोपी अद्याप फरार असून त्यान्हा तपस केला जात आहे. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी झाल्यापासून गुरे चोरांवर धडक कारवाई करत त्यांना लगाम घातला असताना पोलिसांना आव्हान देणाऱ्या या ट्रान्स्फार्मर कॉईल चोरांनाही जेरबंद केलं आहे. त्यामुळे नेरळ पोलिसांचे या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.