DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- बाळासाहेब सोनवणे
सिन्नर:- शहरातील शिवाजी नगर परिसरातून वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची एकदानी माळ ओरबाडून पोबारा करणाऱ्या दोघा दुचाकीस्वार चोरट्यांना सिन्नर पोलिसांनी अवघ्या दोन तासात गजाआड केले. सोनु अशोक भट्टेवाल (२०), रा. राणेनगर, नाशिक, खोवड्या उर्फ रोशन संतोष जोरी (१९), पंचायत समिती समोर सिन्नर अशी या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शांताबाई ज्ञानदेव शिंगणे (६५), सिध्देश्वर कॉलनी, शिवाजीनगर ही महिला शुक्रवारी (दि.१) रात्री ७ ते ८ वाजेच्या दरम्यान शिवाजी नगर परिसरात दत्त मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन भरधाव वेगात आलेल्या दोघा चोरट्यांनी शांताबाई यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची एकदानी माळ ओरबाडून पोबारा केला. शांताबाई यांनी आरडाओरड केली परंतु चोरटे हाती लागले नाही.
शांताबाई शिंगणे यांनी आज (दि.२) सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान बो-हाडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांनी शहर परिसरात या चोरट्यांचा शोध सुरु केला.
दरम्यान, नायगाव रोड परिसरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. संबंधित महिलेने समयसूचकता दाखवत आरडाओरड केल्याने चोरटे त्यांची केटीएम मोटारसायकल (एम.एच.०१, बी.एन. ९९०७) तिथेच सोडून पसार झाले. याबाबत पोलिसांच्या शोध पथकाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी हस्तगत केली. या मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीच्या झाकणात ब्लेड ठेवलेले आढळले. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला व सोनु अशोक भट्टेवाल (२०), रा. राणेनगर, नाशिक, खोवड्या उर्फ रोशन संतोष जोरी (१९), पंचायत समिती समोर सिन्नर यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सोनसाखळी चोरट्यांवर जरब बसण्यास मदत होणार असून पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे व शोध पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.