20 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त
- DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदिले
भिवापूर :- विना रॉयल्टी वाळू भरलेला टिप्पर वाहतूक पोलिसाने पकडला. तो सोडविण्यासाठी टिप्पर मालकाने राडा करीत टिप्पर पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसाने त्याचे प्रयत्न हाणून पाडत टिप्परसह टिप्पर मालकाला ठाण्यात नेवून विविध कलमांतर्गत कारवाई केली.
सदर घटना शुक्रवारला (दि.29) रात्री अकरा वाजताच्या सुमारास येथील सिद्धार्थ नगर परिसरात घडली. अशोक ठाकूर असे सहाय्यक पोलीस हवलदाराचे नाव असून ते वाहतूक पोलीस म्हणून काम करतात.
प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री अशोक ठाकूर हे एका सहकाऱ्यासह पोलीस वाहनाने येथील महामार्गावर पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना एमएच 49 एटी 9790 क्रमांकाचा टिप्पर ओव्हरलोड वाळू भरून निलजकडून येतांना दिसला. येथील तपासणी नाक्याजवळ ठाकूर यांनी टिप्पर चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र न थांबता चालकाने टिप्पर पुढे दमटला. ठाकूर यांनी पाठलाग करीत सिद्धार्थ नगर परिसरात टिप्पर अडवून चालकाकडे रॉयल्टीबाबत विचारणा केली. चालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकूर यांनी टिप्पर पोलीस स्टेशनला लावण्याची सुचना केली. मात्र टिप्पर चालकाने त्यांच्या सूचनेकडे कानाडोळा केला. एवढ्यात सागर नामक टिप्परचा मालक तिथे पोहचला. आल्याआल्याच त्याने टिप्पर का थांबवीला म्हणत ठाकूर यांच्याशी हुज्जत घातली. नंतर पैशाची ऑफर देत टिप्पर सोडण्याची मागणी केली. ती ठाकूर यांनी धुडकावून लावली. या दरम्यान आणखी काही टिप्पर मालक ठाकूर यांच्या आजूबाजूला जमा झालेत. या संधीचा लाभ घेत सागर नामक मालकाने टिप्परच्या चालकाला टिप्पर घेऊन जाण्याचा इशारा केला. ही बाब ठाकूर यांच्या निदर्शनास येताच ते टिप्परची चाबी काढण्यास सरसावले. एवढ्यात सागर ठाकूर यांना आडवा आला व त्यांना धक्का देत दूर लोटण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्याने ठाकूर चांगलेच संतापले. मागला पुढला विचार न करता त्यांनी त्याच्या कानाखाली जाळ काढला व नंतर त्याला पोलीस वाहनात कोंबले. ठाकूर यांचा रुद्रावतार बघून जमलेल्या अन्य टिप्पर मालकांनी आपापल्या वाहनात बसून तिथून काढता पाय घेतला. ते जाताच टिप्पर व टिप्परच्या मालकाला ठाकूर पोलीस स्टेशनला घेऊन गेले. भादवीच्या 379, 109 सहकलम महा. जमीन महसूल अधिनियम 48(8) अन्वये गुन्हा नोंदवित टिप्पर चालक विनोद तामसिंग मडावी 32 रा. दिघोरी, नागपूर व मालक सागर साखरे रा. उमरेड यांच्याविरुद्ध कारवाई केली.
वरील कारवाईत पोलिसांनी टिप्पर किंमत 20 लाख व 6 ब्रास वाळू किंमत 30 हजार असा एकूण 20 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई ठाणेदार प्रमोद चौधरी, सहाय्यक फौजदार अशोक ठाकूर, मनोज चाचरे, चालक बांते यांनी पार पाडली.