आर्थिक मदत करत मोफत बी फार्मसी चे शिक्षण देण्याचे दिले आश्वासन….
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन
जळगाव:- दारिद्र्यावर मात करत बहीण, भावाच्या त्यागामुळे ई. १० वीत ७८% गुण मिळवून उत्तीर्ण झाली ही बातमी वाचून शास्त्री फार्मसी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री हे प्रचंड भावनिक झाले. आणि थेट पोहोचले पिंपळकोठा बु. या गावी कु. ईश्वरी भालेराव च्या छोट्याश्या झोपडीत. ईश्वरी च्या निरागस डोळ्यात अश्रू आले जेव्हा डॉ. शास्त्री यांनी तिला सत्कारार्थी म्हणून तिच्या नावाचा रु. दहा हजार चा धनादेश तिला सुपूर्द केला. तिला भावनिक होताना बघून डॉ. शास्त्री यांना सुद्धा अश्रू अनावर झाले.
एकीकडे सर्व सुखसोयी उपलब्ध असताना सुद्धा बरेच विद्यार्थी हवं तसं यश मिळवू शकत नाही कारण मिळणाऱ्या सुखसोयिंबद्दल त्या विद्यार्थ्यांना महत्व माहित नसते. परंतु गावात पूरग्रस्त परिस्थिती असताना, ईश्वरी चा झोपडीत डोक्यापर्यंत पाणी होतं तरी तीची चिकाटी काही कमी झाली नाही आणि ती निरंतर ग्रामपंचायत च्या खांबाच्या प्रकाशात अभ्यास करत राहिली.
कु. ईश्वरी चा भाऊ आणि आई हे मोलमजुरी करतात आणि वडील एका हॉटेल मध्ये वेटर चे कामं करतात. तिच्या वडिलांनी आश्वासन दिले की माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करीत राहू. डॉ. शास्त्रीनी ईश्वरी ला जेव्हा विचारपूस केली की तुला पुढे काय करायचंय तर तीने जे उत्तर दिलं ते ऐकून उपस्थित सर्व थक्क झाले. ती म्हणाली मला IAS व्हायचंय. त्याचवेळी तिला पदवी शिक्षणासाठी फार्मसी हे क्षेत्र निवडण्यासाठी डॉ. शास्त्रीनीं सुचवलं आणि सांगितलं की तु जर शास्त्री इन्स्टिट्यूट मधून बी. फार्म केलंस तर तुझे चारही वर्षाची फी मी माफ करणार पण आपल्या एरंडोल मध्ये तुझी लाल दिव्याची गाडी भविष्यात यायलाच हवी. आणि यासाठी तुझी अशीच चिकाटी गरजेची आहे. या साठी शास्त्री इन्स्टिट्यूट तर्फे नेहमी सहकार्य लाभेल असे आश्वासनही दिले.
सदरील सत्कार सोहळ्यासाठी पिंपळकोठा चे सरपंच श्याम बडगुजर, प्रा. मंगेश पाटील, प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. सुमेश पाटील व विवेक पाटील यांची उपस्थिती लाभली. या सत्कार कार्यक्रम संपन्न करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी परिश्रम घेतले.