वाळू वाहतूकदार आमने सामने
मास्टर माईंड तीसराच ?
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
नागपूर :- वाळूची अवैध वाहतूक करीत असलेल्या ट्रकची पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरून ट्रक मालकांच्या दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाल्याची घटना विहीरगाव पुलाजवळ घडली. दोन्ही गटाने तक्रार देणे टाळल्याने या घटनेची पोलिस स्टेशनला कोणतीही नोंद नाही.
हाणामारीची घटना गत बुधवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली. भांडणादरम्यान एका गटाने विरोधी गटातील सदस्याच्या चारचाकीवर हल्ला चढवून तीचे नुकसान केल्याचे समजते.
दोन्ही गटातील सदस्य नागपूरचे राहणारे असून ट्रक व्यवसायिक आहेत. ट्रकद्वारे पवनी ते नागपूर वाळू वाहून नेण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. बहुतांश वाहने ही अवैध वाळू वाहतुक करीत असल्याने कित्येकदा त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते. पोलीस पुष्कळशा कारवाया खबऱ्यांकडून मिळालेल्या टीप च्या आधारावरून करतात. त्यासाठी पोलिसांनी काही खबरे पाळून ठेवले आहेत. ते अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची टीप पोलिसांना देतात. अलीकडे खबऱ्यांसोबतच काही ट्रक मालक सुद्धा पोलिसांना टीप देऊन वाहने पकडून देत असल्याच्या वाळू वाहतूकदारांच्या वर्तुळात चर्चा आहेत. वरील भांडणाच्या घटनेमागे हेच कारण असल्याचे समजते.
वरील घटनेत सहभागी एका गटातील व्यक्तीची वाहने सध्या पवनी व लाखांदूर तालुक्यातून भिवापूर, आंभोरा, कुही मार्गे नागपूरला वाळू नेण्याचे काम करतात. याबाबत कुणीतरी पोलिसांना टीप देत असल्याची माहिती ट्रक मालकाला मिळाली. विरोधी गटातील व्यक्तीवर त्याचा संशय होता. त्यातूनच बुधवारी त्यांच्यात आधी मोबाईलवर आरोप प्रत्यारोप झाले. नंतर रात्रीला विहीरगाव पुलावर दोन्ही गट समोरासमोर आले आणी एकमेकांवर हल्ला चढवला. यात कुणी गंभीर जखमी झाल्याची नोंद नाही. घटनेत चारचाकी वाहन क्षतीग्रस्त झाल्याचे समजते.
—-> घटनेचा मास्टरमाईंड तीसराच
मारहानीच्या घटनेमागे तिसऱ्या एका ट्रक मालकाचे डोके असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सदर व्यक्ती भंडारा जिल्ह्यात वाळू घाट चालवित असल्याचे समजते. एका गटाला अद्दल घडविण्यासाठी भांडणाची प्राश्वभूमी तयार करण्यामागे या व्यक्तीचा हात असल्याचे बोलल्या जात आहे. वाळू व्यवसायिकात सुरु झालेला वाद पुढे कोणते वळण घेते याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.