ग्रामीण पोलिसांची कामगिरी
महिलांनो अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा : पोलीस अधीक्षक पोद्दार
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
फ्क महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीस नागपूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शीताफिने अटक केली.
नितेश उर्फ लोकेश सुरेश देशमुख 30 (रा. सिर्सोली ता. मौदा) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पळवून नेलेल्या दागीन्यांसह 1 एक लाख 65 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. फिर्यादी पुष्पा पांडुरंग चौधरी 65 ( रा.मोहखेडी ता. मौदा) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
उमरेड येथे राहणाऱ्या मुलीकडे जाण्यासाठी गत 10 ऑगस्टला साडे चार वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला मौदा येथील बस स्टॅन्डवर उभी होती. एवढ्यात आरोपी मोटार सायकलने तिथे आला. मी उमरेड येथे जात असून तुम्हाला सोडून देतो म्हणत तीला मोटार सायकलवर बसन्यासाठी आग्रह केला. सायंकाळ होत आलेली व बसचा पत्ता नसल्याने आणखी किती वेळ वात पहात थांबणार असा विचार करून फिर्यादी त्याच्यासोबत जायला तयार झाली. दरम्यान उमरेडच्या दिशेने येत असतांना रस्त्यात सोनपुरी (ता. कुही) गावाजवळ आरोपीने मोटार सायकल थांबविली. काही कळायच्या आतच त्याने फिर्यादीच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट व 25 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले व पळ काढला. काही गावकऱ्यांच्या मदतीने फिर्यादीने कुही पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तेव्हापासून कुही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधात होते.
दरम्यान नमूद आरोपी चोरीचे दागिने विकण्यासाठी बुधवारला (दि. 14) मौदा बस स्थानकाजवळ येणार असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्याआधारे सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शीताफिने आरोपीला मौदा येथून अटक केली. त्याच्याकडून पळवून नेलेले 95 हजार रुपये किमतीचे दागिने व 70 हजार रुपये किमतीची मोटार सायकल (क्र. एमएच 40 सीएस 5288)असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळ कुही ठाण्याच्या हद्दीत असल्याने आरोपीला कुही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वरील कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, उपनिरीक्षक बट्टूलाल पांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद काळे, पोहवा अरविंद भगत, मयू ढेकले, प्रमोद भोयर, संजय बरोडिया, राकेश तालेवार, आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे यांनी पार पाडली.
महिलांनो अनोळखी व्यक्तीपासून सावध रहा : अधीक्षक पोद्दार
वरील प्रमाणे लूट व फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी महिलांनी अनोळखी व्यक्तींपासून सावध रहावे, त्यांच्या वाहनांवर बसने टाळावे असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.