DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:-अमर मोकाशी
उमरेड :- उमरेड एमआयडीसी परिसरात असलेल्या एमएमपी कंपनीत गत शुक्रवारी (दि.11) झालेल्या भीषण स्फोटानंतर तपासाला वेग आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरवून टाकला होता. यासंदर्भात DISH (Directorate of Industrial Safety and Health) विभागाने प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यावरून कंपनीच्या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी आहेत.
उमरेड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी कलम 7(अ), 40 आणि 38 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारखाना कायद्यानुसार ही कलमे अत्यंत गंभीर असून, उद्योगातील सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे हा स्फोट घडल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.
DISH अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सखोल तपास केला असून, त्यानुसार सादर केलेल्या प्राथमिक अहवालात व्यवस्थापनातील दोष अधोरेखित करण्यात आला आहे. या आधारे कंपनीचे जनरल मॅनेजर टेंनेटी नरसिंग मुर्ती (वय 56 वर्षे), सेफ्टी ऑफिसर रमण रामचंद्र भाजीपाले (वय 50 वर्षे) व शिफ्ट मॅनेजर अमित शंकरराव बचाले (वय 38 वर्षे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, DISH चा अंतिम अहवाल आल्यानंतर आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या घटनेने औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासनाकडून घटनास्थळी संपूर्ण सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी एमएमपी कंपनीला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पोलिसांकडून तपासाची माहिती घेतली आणि तपास अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देशही दिले. अपघाताच्या पार्श्वभूमीवर कंपनीतील सुरक्षाव्यवस्था, नियमांचे पालन व जबाबदाऱ्या याची चौकशी सुरू असून प्रशासनाकडून सखोल तपास केला जात आहे.