DPT NEWS NETWORK 🗞️ 📹✍️ प्रतिनिधी :- संजय दिंडे
कोल्हापूर:- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IC) व राजारामपुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्ती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येकडे लक्ष वेधत या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सजग होण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता होते. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात व्यसन व गुन्हेगारी यांचा थेट संबंध स्पष्ट करताना नशा ही केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे तर कुटुंब व समाजाच्या प्रगतीलाही अडथळा आणते. गुन्हेगारी व अपघातांची अनेक उदाहरणे व्यसनाशी जोडलेली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. बी फॉर बर्थ आणि डी फॉर डेथ यामध्ये सी फॉर चॉईस असतो व हाच चॉईस आपण सद्सद्विवेक बुद्धीने निवडला पाहिजे. संवाद व समुपदेशन नशामुक्तीसाठी गरजेची असून युवक हीच देशाची खरी ताकद असल्याने त्यांनी नशामुक्त सुदृढ तरुणाईसाठी ठाम निश्चय करणे आवश्यक आहे, असे आवाहनही केले. अमली पदार्थ विरोधी कायदा तसेच मिशन झिरो ड्रग बद्दल माहिती देत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी तरुणांमधील नशा व नशामुक्तीमधील आव्हाने विशद केली. क्षणिक सुखाकरिता व्यसनाधीन न होता, कष्ट करून चिरकाल टिकणारा आनंद मिळवता आला पाहिजे हे सांगताना त्यांनी व्यसनामुळे होणाऱ्या भीषण आरोग्य दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. मद्यपान, धूम्रपान आणि अंमली पदार्थ यामुळे यकृत, हृदय आणि स्नायूंवर गंभीर परिणाम होतात. त्याशिवाय व्यक्तीच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्पैर्यावर देखील परिणाम होतो. व्यसनामुळे स्मरणशक्ती कमी होते, मेंदूवर परिणाम होतो, नैराश्य व आत्महत्येचे प्रमाण वाढते. अमली पदार्थासोबतच समाजामधील मोबाईल फोन्स, सोशल मीडिया यांचे वाढते व्यसन चिंताजनक असून त्यामुळे कुटुंबसंस्थेला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी फियर ऑफ मिसिंग आऊट या गैरसमजामुळे अनेकदा तरुण व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आणले. भावनिक बुद्धिमत्तेचा वापर शरीर व समाजासाठी चांगले वाईट ओळखण्यासाठी केला पाहिजे, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी तरुणाईला नशामुक्ती करीता स्वयं परीक्षण व आत्मनियंत्रण अतिशय महत्वाचे असून सुदृद्ध नशामुक्त तरुण हेच राष्ट्राचे भवितव्य आहेत, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी उत्तम नागरिक होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करणे अतिशय महत्वाचे असून आरोग्यास हानिकारक व्यसनापासून दूर राहून व्यक्तिमत्व घडविणाऱ्या सवयींची निवड करणे गरजेचे असल्याचे सांगितले. व्यक्तिमत्व घडविताना उत्कृष्ट पुस्तके वाचली पाहिजेत तसेच जाणीवपूर्वक चांगले छंद जोपासले पाहिजेत असेही ते म्हणाले. व्यसनमुक्ती व आरोग्य या विषयांची विद्यार्थ्यांसाठी असलेली गरज त्यांनी अधोरेखित केली, शिवाजी विद्यापीठ सामाजिक भान निर्माण करणाऱ्या उपक्रमांना सदैव प्रोत्साहन देते असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हर्षवर्धन पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर यांनी केले. कार्यक्रमास शहर डीवायएसपी प्रिया पाटील, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, विद्यापीठातील प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



