DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
बिलोली :- बिलोली तालुक्यातील बावलगावची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गावातील मुख्य रस्ता चिखलाने भरलेला असून अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत तीन वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई झाली, मात्र ते काम आजही अर्धवटच राहिले आहे. हे काम का थांबले आणि जबाबदार कोण याचे उत्तर ग्रामस्थांना अजूनही मिळालेले नाही.
बावलगावातील शेतकऱ्यांची पण अवस्था अधिकच वाईट आहे. शेतात जाण्यासाठी रस्तेच नाहीत. शिवरस्ते व पांदनरस्ते पूर्णपणे खराब झाले असून त्यांची दुरुस्ती करण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे बावलगाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तरीसुद्धा या गावात आमदारांनी भेट दिलेली नाही. ग्रामस्थ विचारतात, आमदारांना मोठ्या गावात जायला वेळ असतो, पण आमच्यासारख्या लहान गावांकडे त्यांचं लक्ष नाही का? आमचं मत कमी महत्त्वाचं आहे का, पण गावातील चिखल, अंधार आणि उद्ध्वस्त रस्त्यांमुळे आम्हाला रोज त्रास सहन करावा लागतो. गावाच्या मध्यभागातून जाणारा मुख्य रस्ता चिखलमय झाला असून, याकडे ग्रामपंचायत सरपंच, ग्रांमसेवक, उपसरपंच व सदस्य, नागरिकांच्या मागण्यांकडे कोणीच लक्ष देत नाही. आम्ही कोणावरही टीका करत नाही पण विरोधक शांत आहेत आणि सत्ताधारीही मौन बाळगून आहेत. दिवाळीच्या काळात गाव प्रकाशमय असावा अशी अपेक्षा असते, मात्र काही घरांसमोर अंधार कायम राहिला. विशेष म्हणजे एका विधवा महिलेच्या घरासमोरचा खांब अंधारात होता. त्या महिलेने सांगितल्यानंतरच बल्ब लावण्यात आला. मग प्रश्न असा अगोदर का लावला नाही? असा संताप ग्रामस्थांमध्ये आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, आमदार जितेश अंतापूरकर यांनी बावलगाव या गावाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. रस्त्याच्या व पायाभूत सुविधांच्या बाबतीत ग्रामस्थांनी अधिकारी आणि मंत्रालयापर्यंत निवेदनं दिली, तरीही कोणत्याही विभागाने लक्ष दिलं नाही. मतदानाच्या वेळी मत मागायला येतात, पण निवडून आल्यावर गाव विसरतात, असा नागरिकांचा रोष आहे. आता गावकऱ्यांनी ठाम मागणी केली आहे की, या सर्व समस्यांकडे आमदारांचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण यांनी तरी लक्ष द्यावे. बावलगावचे प्रश्न सोडवले नाहीत, तर ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील आणि पुढील निवडणुकीत मतपेटीतून उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.




