मुंबई : वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेलेल्या वृद्धाला घरी परतल्यावर मोठा धक्का बसला. सुरुवातीला घराचा दरवाजा उघडा दिसला, तर आत जाऊन पाहिल्यानंतर घरातील मौल्यवान दागिने, लॅपटॉप, टीव्ही अशा अनेक वस्तू चोरीला (Theft) गेल्याचं त्यांना समजलं. मुंबईतील मालाड परिसरात हा धक्कादायक प्रकार (Mumbai Crime) घडला होता. मात्र मालाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीला गजाआड केले आहे. पाच चोरट्यांना शहराच्या वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून तब्बल 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल या टोळीने चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दागिने, टीव्ही आणि उर्वरित 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर 25 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आरोपी टॅक्सीने रात्रभर परिसराची रेकी करुन दिवसा चोरी करत असल्याचं समोर आलं आहे.
एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून 40 लाखांचा मुद्देमाल चोरणाऱ्या टोळीतील पाच जणांना मुंबईतील मालाड पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे.
नेमकं काय घडलं
पोलिसांनी सांगितले की 1 फेब्रुवारी रोजी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित वृद्ध वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर गेला होता, रात्री परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा खुला दिसला. घरातील मौल्यवान दागिने, लॅपटॉप, टीव्ही असे अनेक साहित्य चोरीला गेल्याचे त्यांना आढळले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवला, पोलिसांची वेगवेगळी विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक पुराव्याच्या साहाय्याने पोलिसांनी त्याचे स्वरुप बदलून पहिल्या आरोपींच्या मागे वॉच ठेवला आणि एकामागून एक पाच आरोपींना अटक केली.
आरोपी चोरीच्या गुन्ह्यात सराईत
झोन 11 चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी चोरीच्या गुन्ह्यात सराईत आहेत. त्यांच्यावर 25-25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दागिने, टीव्ही आणि उर्वरित 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक आरोपींची नावे
1.नौशाद खान, वय 31 वर्षे,
2. सद्दाम खान, वय 34 वर्ष,
3. रॉनी अल्ताफ, वय 35 वर्ष,
४.अब्दुल पठाण, वय 40 वर्ष,
५. गुड्डू सोनी, वय 35 वर्ष,
गुड्डू सोनी याच्यावर चोरी, दरोड्याचे 29 गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी मुंबईचे रहिवासी आहेत, मात्र त्यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीणसह अनेक भागात गुन्हे दाखल आहेत, याआधीही सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती.
मोडस ऑपरेंडी काय होती?
ही टोळी चोरीसाठी टॅक्सी वापरते. टॅक्सीने रात्री वेगवेगळ्या भागात जाऊन ते रेकी करतात आणि दिवसा चोरी करुन पळून जातात, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या सर्व आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, या प्रकरणी आरोपींकडून चौकशी केल्यानंतर आणखी काही जणांना अटक होऊ शकते.