हिंगोली : आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलाला प्रशासनाने चांगलाच दणका दिला. वृद्ध दाम्पत्याला दरमहा पोटगी देण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील रहिवासी असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना लेकाने वाऱ्यावर सोडलं होतं. विशेष म्हणजे म्हातारपणात आई-वडिलांची काठी होण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणारा मुलगा पेशाने प्राध्यापक आहे. उप विभागीय अधिकरी सचिन खाल्लाळ यांनी मुलाला चांगलाच दणका दिला आहे. प्राध्यापक मुलाने दरमहा सात हजार रुपये पोटगी, औषधं, शस्त्रक्रिया आणि संपूर्ण वैद्यकीय खर्च देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढले आहेत. आदेशाचा अवमान केल्यास कायद्यानुसार एक महिना कारावास देण्यात येईल, अशी सूचना सर्व मुलांना आदेशातून देण्यात आली आहे.
आई-वडिलांनी शेती विकून मुलाला प्राध्यापक केले, मात्र विद्याविभूषित मुलाची मती फिरली आणि त्याने आई-बापाला वाऱ्यावर सोडले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात हा प्रकार घडला. मात्र सुरेश नंदाबाई या वृद्ध दाम्पत्याला प्राध्यापक मुलाने दरमहा सात हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश वसमतचे उपविभागीय अधिकारी सचिन खाल्लाळ यांनी काढले आहेत.
संबंधित दाम्पत्याने मजुरी करुन तीन मुलांना शिकवले. एका मुलासाठी शेती विकून त्याला प्राध्यापक केले. तो एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. बायको-मुलांसह राहणाऱ्या मुलाला जन्मदात्यांचा मात्र विसर पडला. इतर दोन मुलं आई-वडिलांचा सांभाळ करतात. मात्र रिक्षा चालक आणि मजूर असणाऱ्या या मुलांचं कुटुंबही मोठं आहे.
वडिलांना रक्तदाबाचा विकार जडला, तर आईची दृष्टी अधू झाली. औषधांसाठी दरमहा पाच हजार रुपये खर्च येतो. उत्पन्नाचं साधन नाही आणि खर्चही वाढता. त्यामुळे प्राध्यापक मुलाने त्यांना दरमहा सात हजार रुपये पोटगी, औषधं, शस्त्रक्रिया आणि संपूर्ण वैद्यकीय खर्च देण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आहेत. आदेशाचा अवमान केल्यास कायद्यानुसार एक महिना कारावास देण्यात येईल अशी सूचना सर्व मुलांना आदेशातून देण्यात आली आहे.