नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी. जी.बी. शेतकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय कळंबू येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव बोरसे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली. पुण्यतिथीच्या निमित्ताने मागील दोन वर्षात यश संपादित केलेले H S C तसेच SSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव बोरसे यांच्या पुतळ्याला विद्यमान अध्यक्ष श्री विजयराव बोरसे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले नंतर पारितोषिक वितरण समारंभास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दिवंगत गुलाबराव बोरसे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजयराव बोरसे होते. बारावीत व दहावीत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच विविध विषयात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांना आणि स्कॉलरशिप परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रकमेचे लिफाफे देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभानंतर सेवानिवृत्त झालेले श्री ए एन सनेर,श्री के के सोनवणे तसेच श्री डी वी बोरसे या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.श्री के के सोनवणे यांनी सेवानिवृत्तीपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव बोरसे, सचिव दत्तात्रय मोरे, विद्यालयाचे प्राचार्य प्रा.एम.ए.चौधरी, पर्यवेक्षक प्रा.एस.ए.संधानशिव, सेवानिवृत्त शिक्षक के.के.सोनवणे, गुरुवर्य ट्रस्ट चे श्री मोहन माळी, श्रीकांत देशपांडे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भूषण गवळे यांनी मानले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री चौधरी सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.