राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. तसेच नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले.
माध्यमांपुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळातील एखाद्या व्यक्तीला पहाटे पाच वाजता समन्सशिवाय ताब्यात घेणे, त्यानंतर ईडी कार्यालयात गेल्यानंतर समन्स देणे, हा सर्व प्रकार कायदा धाब्यावर बसून केलेला प्रकार आहे, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
तसेच सर्व खरेदी प्रक्रिया रीतसर करण्यात आली आहे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी मांडले. यात कोणताही आतंकवादी दृष्टीकोन लावण्याची गरज नाही असे ते म्हणाले. नवाब मलिक यांना हसिना पारकर यांना धरून दाऊन इब्राहिमपर्यंत त्यांना जुळवण्याचे काम सुरु आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच मागील वीस वर्षांपासून यावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही, अचानकपणे हे सुरू झाल्याचे जयंत पाटील म्हणाले.
मागील वीस वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर होणाऱ्या तक्रारीवर एखाद्या व्यक्तिला स्पष्टीकरणासाठी काहीसा वेळ देणे आवश्यक होते. पण त्या व्यक्तीला कोणतीही संधी न देता केवळ अटक करण्याचा प्रकार हा संपूर्ण अजब आहे. नवाब मलिक हे या प्रकरणातील इनोसण्ट बायर आहेत. या खरेदीची २०१८ साली जाहीरात प्रसिद्ध केली असतानाही मुनिरा प्लंबर अथवा त्यांच्या आईने कुठेही आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे १५-२० वर्षांनंतर पॉवर ऑफ अटर्नी ज्याच्या नावे आहे त्याने पैसे दिले नाही, त्या व्यक्तीवर कारवाई करायची की ज्यांनी रीतसर जमीन खरेदी केली त्यांच्यावर कारवाई करायची, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात खरेदी करणारा हा इनोसेंट बायर आहे. त्यामुळे ओढूनताणून या प्रकरणाला दहशतवादी दृष्टीकोन अणून नवाब मलिक यांना बदनाम करण्याची मोहीम सुरु झाली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. नवाब मलिक हे अनेक वर्षांपासून विधिमंडळात काम करत आहेत. या सर्व काळात आम्ही त्यांना जवळून पाहीले आहे. त्यांचा कोणत्याही गुन्हेगारांशी संबंध आलेला नाही. त्यामुळे नवाब मलिक निर्दोष आहेत, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.