कर्जत (जयेश जाधव) : कडक आवाज, रागीट स्वभाव आणि खाकीचा धाक अशी पोलिसांची ओळख असते परंतु या ‘खाकी’त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कडक शिस्तीच्या खाकी वर्दीच्या पलीकडे देखील माणुसकी असते हे कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार जयवंत काठे यांचे कार्य पाहून पुन्हा एकदा सिद्ध झाले. कर्जत पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले जयवंत काठे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एका वृध्द अपंग व्यक्तीची मधमाश्यांच्या तावडीतून सुटका करून त्यांना स्वतः दवाखान्यात दाखल केले आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल जवळच असणाऱ्या एका झाडावरच्या मधमाश्यांच्या पोळ्याला लागला. याचवेळी झाडाखालून एक अपंग व्यक्ती जात होती. या अपंग आजोबांना जागेवरून हलता येत नसल्याने मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित असून देखील कोणीच पुढे येण्याची हिंमत केली नाही मात्र कर्जत पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले हवालदार जयवंत काठे यांनी हा सारा प्रकार पाहताच या ठिकाणी धाव घेत आपल्या गाडीत असलेल्या कापडांचा लगदा करून तो पेटवला आणि मधमाश्यांच्या तावडीतून या आजोबांची सुटका केली. आपल्या जीवाची पर्वा न करता एका अपंग वृध्द व्यक्तीला मधमाश्यांपासून वाचवून पोलिसांमध्ये सुद्धा माणुसकी असते ही गोष्ट सिद्ध केली. आज जयवंत काठे यांनी केलेल्या कार्यामुळे आणखी एक माणुसकीचे बीज पेरलं गेलंय.