DPT NEWS NETWORK नवी दिल्ली : दिल्लीतील जहाँगीरपुरी भागात हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. या हिंसाचारात नऊ जण जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक मेधालाल मीणा यांच्या हाताला गोळी लागली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गोळीबार करणार्या असलम नावाच्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीसांनी 3 पिस्तूल, 5 तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे.
दरम्यान, या हिंसाचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी काल हिंदू संघटनांनी रथयात्रा काढली. यावेळी तलवारी हातात घेऊन तरुण सहभागी झाले होते. शनिवारी पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, कुशल चित्रपटगृहाजवळ मिरवणूक पोहोचल्यानंतर दोन समुदायांत संघर्ष झाला. यानंतर काही समाजकंटकांनी दगडफेक सुरू केली. हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले आहेत. तसेच, यावेळी अनेक वाहने पेटवून देण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची दखल घेतली आहे. दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिला आहे. जहाँगीरपुरी व इतर संवेदनशील भागांत अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांची दहा विशेष पथके तयार करून दंगेखोरांचा शोध सुरू आहे.?
दिल्लीच्या जहांगीरपुरीत हिंसाचाराची घटना घडल्यानंतर रविवारी हिंदू संघटनांकडून रथयात्रा काढण्यात आली. दिल्लीतील विकासनगर परिसरात हिंदू संघटनेकडून रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातात तलवारी, काठ्या आणि इतर शस्त्र घेऊन नागरिक यात सहभागी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ?
दोन आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत
पोलिस उपनिरिक्षकाला मारहाण व गोळीबार प्रकरणी दिल्ली न्यायालयाने दोन आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान, आरोपींमध्ये 21 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. न्यायाधिश दिव्या मल्होत्रा यांनी हा निर्णय दिला. त्यांनी महमद असलम आणि त्याचा साथीदार महमद अन्सार यांना सोमवारपर्यंत कोठडी सुनावली. याशिवाय इतर 12 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, असलम आणि महमद या दोन मुख्य आरोपींनी हिंसाचाराचा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोळीबार करणारा अल्पवयीन; कुटुंबीयांचा दावा
गोळीबार करणार्या एका आरोपीला पोलिसांनी काल सकाळी अटक केली. पण, गोळीबार करणारी व्यक्ती अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीचा जन्माचा दाखला दाखवत कुटुंबीयांनी त्याचा जन्म 2005 मध्ये झाला आहे. त्यामुळे आता तो फक्त 17 वर्षांचा आहे. तो अल्पवयीन आहे, असा दावा केला. पण, तो 21 वर्षांचा असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या एका प्रकरणात या आरोपीचा सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच आरोपीकडून पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे.