DPT News Network धुळे : धुळे शहरात झाडांची सर्रास कत्तल करण्याचे प्रकार वाढले असतांना आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानातील झाडेही सुरक्षित राहिलेली नाहीत. रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानाच्या आवारात असलेले मौल्यवान चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
जिल्हाधिकारी बंगल्यावर पोलिसांचा चोविस तास जागता पहारा असतो. असे असतानाही पोलिसांच्या हातावर तुरी देवून चक्क चंदनाचे झाड लांबविण्यात चोरट्यांना यश आलेच कसे? तेथे 24 तास पहारा देणारे पोलीस नेमकी झोपा काढतात की काय ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातून चंदन चोरणाऱ्या या पुष्पाला पकडण्याचे आवाहन आता धुळे शहर पोलिसांसमोर असणार आहे.
हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून चोरट्यांची हिंमत वाढल्याचेच यावरून दिसून येत आहे. चोरट्यांनी जिल्हा अधिकारी यांचा बंगलाच सोडला नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न जनतेच्या मनात उभा राहत आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.