उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी – प्रवीण चव्हाण
नंदुरबार – बुक केलेल्या ओला कंपनीची गाडीची डिलीव्हरी मिळण्यासाठी अज्ञात इसमाने खोटी कारणे सांगून करणखेडा ता.नंदुरबार येथील मनेश अशोक पाटील यांची ८९ हजार ५०० रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास करणखेडा (ता.नंदुरबार) येथील मनेश यांनी ओला कंपनीची बुकिंग केलेली मोटारसायकल किती दिवसात भेटेल याबाबत त्यांच्या मोबाईलवरुन गुगल ऍपवर OLA वेबसाईट सर्च करून सदर कंपनीचा मोबाईल नंबर ८१४५२५५९५६ प्राप्त केला.
त्याच्यावर फोन करून त्यांनी एक वर्षापुर्वी ४९९ रुपये भरून बुकिंग केलेली ओला कंपनीची मोटारसायकल किती दिवसात मिळेल, याबाबत विचारणा केली. त्यावर समोरील अज्ञात व्यक्तीने तुमची मोटरसायकल ऑनलाईन बुकिंग झालेली आहे.
सदर मोटरसायकल एक लाख रुपये किमतीची आहे. परंतु सध्या ऑफर सुरु असून त्यातून १० हजार रुपये सबसिडी देण्यात आली आहे. तसेच तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेले ४९९ रुपये कापून ८१ हजार ५०० रुपये माझ्या अंकाउंटवर गुगल पे, फोन पे, YONO ऍपद्वारे पाठवून द्या, असे सांगितले.
त्यामुळे पाटील यांनी एवढी मोठी रक्कम सदर ऍपवर पाठवता येत नाही असे सांगितल्याने त्याने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली, ती ओपन करून सदर अकाउंटवर RTGS ने किंवा NEFT ने तुम्ही ८९ हजार ५०० रुपये पाठवून द्या असे सांगितले.
त्यामुळे पाटील यांनी लागलीच स्टेट बँक शाखा गुजर जांभोली ता.जि.नंदुरबार येथे जावून चेकने कोरामंगला बँक बँगलोर खाते क्र.११००६८०९७३०७ या खात्यात RTGS ने पाठविले.समोरील व्यक्तीने पाटील यांना पैसे पाठविल्याची स्लिप व्हॉट्सऍपवर पाठवली
व फिर्यादीस सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान परत फोन करून सांगितले की तुमच्या मोटार सायकलच्या रजिस्ट्रेेशनसाठी १८ हजार ९९९ रुपये परत टाका असे सांगितल्याने पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
याबाबत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.