मुंबई: पोलिसांकडून सायबर क्राईमबाबत वारंवार सूचना दिल्या जातात. तुमची व्यक्तिगत माहिती आणि ओटीपी (OTP) नंबर कुणालाही देऊ नका, असं वारंवार सांगितलं जातं. मात्र, तरीही सायबर गुन्हे घडत आहेत. सामान्य लोकच नव्हे तर शिकले सवरलेले लोकही या सायबर क्राईमचे बळी ठरत आहेत. आता यात प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांचं नावही जोडलं गेलं आहे. अन्नू कपूर हे सुद्धा ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झाले आहेत. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून 4.36 लाख रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे कपूर यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
या चोरट्यांनी अन्नू कपूर यांना बँक कर्मचारी बनून फोन केला होता. कृष्णकुमार रेड्डी नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला होता. त्यांनी कपूर यांना केवायसी अपडेट करण्यासाठी काही डिटेल्स मागितली होती. मी एचएसबीसी बँकेचा मॅनेजर बोलतोय. तुमच्या अकाऊंटचे केवायसी करणे आवश्यक आहे. तसे नाही केलं तर तुमचं अकाऊंट बंद होईल, असं त्याने अन्नू कपूर यांना सांगितलं.
त्यानंतर त्याने कपूर यांना ओटीपी नंबर मागितला. अन्नू कपूर यांनीही ओटीपी नंबर शेअर केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातील 4.36 लाख रुपये इतर खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. जेव्हा या फसवणुकीची माहिती मिळाली तेव्हा अन्नू कपूर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.
कपूर यांची तक्रार मिळताच पोलिसांनी ज्या खात्यात पैसे गेले, ते खाते सील केले. तसेच त्या खातेधारकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कपूर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात आयटी अधिनियमाच्या कलम 419, 420 आणि कलम 66 (सी) (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सकुंडे आणि पोलीस उपनिरीक्षक कुरकुटे यांच्या टीमने तात्काळ एचएसबीसी बँकेशी संपर्क साधला.
यावेळी हे पैसे कॅनरा आणि युनियन बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचं कळलं. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही खाते सील करून 3 लाख 8 हजार रुपये हस्तगत केले.p