आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कर्जत प्रभात दिवाळी अंकाचे प्रकाशन
कर्जत (प्रतिनिधी)कर्जत येथून नियमितपणे प्रसिद्ध होणारे कर्जत प्रभात वृत्तपत्र दरवर्षी दीपावलीनिमित्त विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. अगदी कोरोना काळातही त्यात खंड पडला नाही. ‘कर्जत प्रभात’ दिवाळी अंकांची परंपरा जपली असून यंदा विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक विषयावर आधारित अंक प्रसिद्ध करून या अंकातून वाचकांना पर्वणी दिली आहे, असे उदगार कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काढले.
‘कर्जत प्रभात दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, कर्जत तालुका समन्वयक समिती सदस्य अनिल जाधव, कर्जत प्रभातचे संपादक जयेश जाधव, पत्रकार कृष्ण सगणे, प्रशांत परदेशी, उपसरपंच हर्षल विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पोसरी येथील शिवतीर्थ निवासस्थानी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. प्रारंभी आमदार महेंद्र थोरवे यांचा कर्जत प्रभात परिवारातर्फे मार्गदर्शक उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
‘कर्जत प्रभात दिवाळी अंकात निसर्ग आणि प्रवासवर्णन यांची चांगली सांगड घातली आहे. शिर्डीचे साईबाबा यांचे मुखपृष्ठही सुंदर आहे. या अंकात रायगडसह महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील पर्यटनावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. याशिवाय कथा, कविता, यांचाही समावेश आहे. त्यामुळे हा सर्वांग सुंदर अंक सर्वांना आवडेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र अंक पोहोचेल आणि कर्जत प्रभात आणखी नावारूपाला येईल, असे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.ते पुढे बोलताना सांगितले कर्जत प्रभातचे संपादक जयेश जाधव यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अनेक संघर्षमय जीवनातून पत्रकारितेची यशस्वी वाटचाल केली आहे.असे सांगून कर्जत प्रभात दिवाळी अंकास शुभेच्छा दिल्या
उपजिल्हाप्रमुख भाई गायकर आणि अनिल जाधव यांनीही ‘कर्जत प्रभात’ अंकाचे कौतुक करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.