DPT NEWS NETWORK प्रतिनिधी – जयेश जाधव
पनवेल : दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचे महत्त्व अनन्यसाधारण बनले आहे. फेसबुक, व्हाट्सअप यांसारख्या माध्यमांचा तर मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. कधी कधी या माध्यमांचा वापर जीवावर बेतत आहे. यापूर्वीही व्हाट्सअप ग्रुपमध्ये अॅड न केल्याच्या नैराश्येतून अॅडमिनवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने त्याच्या घरातील वायफायचा पासवर्ड सांगितला नाही, या क्षुल्लक कारणावरून त्याची हत्या करण्यात आली.
हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणाऱ्या दोघा युवकांनी हे निर्घृण कृत्य केले आहे. पनवेलच्या सेक्टर नंबर-14 मध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक
मुलाचा प्राण घेणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यू झालेल्या मुलाने त्याच्या वायफायचा पासवर्ड सांगितला नाही. त्यामुळे दोन्ही आरोपींचा पारा चढला. त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
इतक्यावरच न थांबता त्याने मुलावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. रवींद्र अटवाल उर्फ हरियाणवी आणि संतोष वाल्मिकी अशी आरोपींची नावे आहेत.
दोन्ही आरोपी आणि हत्या झालेला मुलगा हे तिघेही शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास पान टपरीवर गेले होते. या दरम्यान दोन्ही आरोपींनी मुलाकडे त्याच्या वायफायचा पासवर्ड मागितला. पासवर्ड देण्यास मुलाने नकार दिला. त्यावर आरोपींनी त्याला शिवीगाळ सुरू केली.
यानंतर संतापलेल्या मयत मुलाने देखील शिव्या देण्यास सुरुवात केली. या वादामध्ये दोन्ही आरोपींनी मुलाला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले, त्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे लहान मुलाचा मृत्यू झाला.