DPT NEWS NETWORK. प्रतिनिधी – शांताराम दुनबळे
नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी थांबत नसतांना, नाशिक शहर पोलीसांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष आवाहन केलं होतं. मौल्यवान वस्तु घरात न ठेवता त्या स्वतःजवळ बाळगा, सहलीला किंवा गावी जाणार असाल तर शेजारच्या व्यक्तीला याबाबत माहिती द्या, अशा सूचना करत आवाहन करण्यात आले होते. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण गावी किंवा सहलीला जाण्याची संधी शोधत चोरटे चोऱ्या करत असतात. अनेकदा घरफोडीच्या घटना समोर येत असतात. असं असतांना पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना काही सूचना केल्या होत्या, त्याच सुचनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने तीन लाखांची रोकड आणि 44 तोळे दागिने चोरीला गेले आहे. बंगला बंद असल्याचे पाहून खिडकीचे गज कापून चोरट्यांनी मुद्देमाल लांबविला आहे.
दिवाळी सुरू होण्यापूर्वीच घरात मौल्यवान वस्तु ठेऊ नका, घरफोड्या होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी गस्त वाढविण्याबरोबरच काही सूचना केल्या होत्या.
मात्र त्या सुचनांकडे राजेश गायकर यांनी दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. कामटवाडे परिसरात असलेल्या श्री समर्थ कृपा बंगलोमध्ये चोरी झाली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने गायकर कुटुंब हे त्यांच्या गावी नांदगाव येथे गेले होते, गाववरून परतल्यानंतर कपडे अस्ताव्यस्त असल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले आहे.
चोरट्यांनी बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापूत आत प्रवेश करत तीन लाखाची रोकड, 44 तोळे सोने आणि 8 किलो चांदी चोरीला गेली आहे.
गायकर यांच्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली असून घरफोडी झाल्याबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करीत आहे.