DPT NEWS NETWORK. प्रतिनिधी – दिप्ती पाटील
रायगड : मुंबई – गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान, नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने गेल्या महिन्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा रायगडमध्ये संशयस्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबई – गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळली होती. भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीन सदृश्य कांड्या सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. काल सायंकाळी भोगावती नदीपात्रात गेलेल्या व्यक्तीला पाण्यामध्ये संशयास्पद वस्तू दिसून आली. या घटनेची पेण पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्याशिवाय रायगड पोलीस अधीक्षक, खालापूर, रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झालं होतं. त्याशिवाय मुंबई आणि रायगड येथील बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. अखेर संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, मुंबई- गोवा हायवेवरील पुलाखाली मिळालेल्या स्फोटक सदृश्य वस्तुमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, नदीपात्रात आढळलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तूच्या पडताळणीसाठी रायगड आणि नवी मुंबईतील बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी, सुमारे चार तास सुरु राहिलेल्या पडताळणीमध्ये जिलेटीन सदृश्य स्फोटकांच्या सहाय्यानं डमी बॉम्ब बनवण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी, या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये वायर आणि घड्याळाचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
बॉम्ब सदृश्य वस्तू नदीपात्रात आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर त्वरीत नवी मुंबई आणि रायगडची पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. हा बॉम्ब डमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आज या परिसरात आणखी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. नेमक्या या वस्तू कोणी ठेवल्या, या वस्तू ठेवण्यामागं त्याचा काय उद्देश काय होता याचा तपास करत असल्याची माहिती देखील सोमनाथ घार्गे यांनी दिली.