DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – दत्तात्रय माने
पुणे : तरुणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने व आईने ज्या युवकाशी तिने लग्न केले त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी मयुर संजय चव्हाण व सुनीता संजय चव्हाण (रा. लक्ष्मीनगर, माळेगाव कॉलनी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र बबन वाबळे (रा. लक्ष्मीनगर, माळेगाव कॉलनी, बारामती) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीच्या शेजारीच संजय दिनकर चव्हाण हे राहतात. फिर्यादीचा मुलगा अमोल याचे संजय चव्हाण यांची मुलगी धनश्री हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांनी याबाबत या दोघांनाही यापूर्वी प्रेमसंबंध न ठेवण्याची ताकीद दिली होती. परंतु त्यानंतरही अमोल व धनश्री हे दोघे २३ नोव्हेंबरला पळून गेले. त्या दिवशी मयुर चव्हाण याने फिर्यादीला फोन करत “माझ्या बहिणीला अमोल याने पळवून नेले आहे, त्याला घेवून तुम्ही अर्ध्या तासात घरी या”, असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी हे इचलकरंजीला कामानिमित्त गेले होते.
२४ नोव्हेंबरला ते घरी परत आल्यावर त्यांनी मुलाचा शोध सुरु केला. त्या दिवशी सायंकाळी मयुर याने फिर्यादी यांचा मुलगा विकास राजेंद्र वाबळे याला “अमोल व धनश्री कुठे आहेत ते सांग”, म्हणत त्याला मारहाण केली. परंतु यासंबंधी फिर्यादीने त्यावेळी कोणतीही तक्रार दिलेली नव्हती. त्यानंतर २५ तारखेला मुलाचा शोध घेवून ते सायंकाळी घरी आले असताना मयुर हा आई सुनिता चव्हाण यांच्यासोबत फिर्यादीच्या घरी आला. त्याने ते दोघे कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावर आम्ही त्यांचा शोध घेत असून अद्याप तपास लागलेला नाही, असे फिर्यादी यांनी सांगितले.
यावर मयुर याने फिर्यादी यांचा मुलगा विकास याला शिविगाळ करत “माझी बहिण आताच्या आता इथे पाहिजे, नाही तर तुला आता जीवंत ठेवत नाही”, असे म्हणत तेथे पडलेला दगड उचलून विकासच्या डोक्यात घातला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुनिता चव्हाण यांनीही मारहाण केली. त्यामुळे विकास हा जागीच बेशुद्ध पडला. त्याला माळेगाव येथील काटे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून बारामतीत गिरिराज हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा प्रकार घडल्यानंतर अमोल व धनश्री हे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी स्वतःहून सज्ञान असल्याने प्रेम विवाह केल्याचे सांगितल्याने त्यांनाही संरक्षण देण्यात आलं आहे. कायद्यामुळे दोन सज्ञान युवकांचे मिलन झाले परंतु दोन कुटुंब सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले. एक जण मरणाच्या दारात आहे तर एक जण आयुष्यभर बंदिस्त जीवन जगण्याच्या मार्गावर आहे.