DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: मनोज पवार मालेगाव : गाय, म्हशींना दुधाचा पान्हा लवकर फुटावा यासाठी वापरण्यात येणारे बनावट ऑक्सिटोसिन इंजेक्शनची(Oxytocin injection ) निर्मिती होत असलेल्या गोदामावर पवारवाडी पोलिसांनी छापा टाकत इंजेक्शन निर्मिती साहित्याचे 52 बॉक्स जप्त केले. या प्रकरणी ऑक्सिटोसिन इंजेक्शनची निर्मिती करणार्यास देखील अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे बनावट ऑक्सिटोसिन इंजेक्शनची निर्मिती होत असल्याचे उघडकीस आल्याने पशुपालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. म्हाळदे शिवारातील एका प्रार्थनास्थळालगत पत्र्याच्या गोदामात गाई, म्हशींना दुधाचा पान्हा लवकर फुटावा यासाठी वापरण्यात येणार्या इंजेक्शनची बनावट निर्मिती केली जात आहे. सदरचे ऑक्सिटोसिन इंजेक्शन बनावट असल्याची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुधीर पाटील, सपोनि डी.जे. बडगुजर यांनी पोलीस पथकासह अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांच्या मदतीने संबंधित इंजेक्शनची निर्मिती होत असलेल्या शेडवर छापा टाकला असता तेथे बनावट ऑक्सिटोसिनची निर्मिती व विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदरची इंजेक्शने तयार करणार्या शराफ मुश्ताक नासन (रा. बोरीवली, हल्ली हिरापुरा, मालेगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेत सदर गोदामातून रंग नसलेले द्रावण, ऑक्सिटोसिनच्या बाटल्या तसेच कच्चा माल, बॉक्सपट्टी असे 95 हजार 450 रूपयांचे 52 बॉक्स जप्त केले. इंजेक्शन तयार करणार्या शराफकडे औषध निर्मितीचा कुठलाही परवाना नसल्याचे तसेच त्याने फार्मसी अथवा कुठलेही वैद्यकिय शिक्षण घेतले नसल्याचे चौकशीत पोलिसांना समजले. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक प्रशांत ब्राम्हणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शराफ हसन विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि बडगुजर हे अधिक तपास करीत आहेत.