DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – संदीप अहिरे
धुळे : धुळे शहरात शनिवारी साक्री रोडवरील यशवंत नगरात पतीनेच धारदार हत्याराने वार करीत पत्नीची निर्घुण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दिपाली नागेश कानडे (वय 28 रा.यशवंत नगर, साक्री रोड, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास तिचे आणि पती नागेश दगडू कानडे यांचे जोरदार भांडण झाले. त्यातूनच नागेश याने धारदार हत्याराने पत्नी दिपाली हिच्यावर वार केले. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही बाब लक्षात येताच नातेवाईक व परिसरातील नागरिक धावून आले. दिर गणेश दगडू कानडे याने तिला हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी पती नागेश कानडे याला ताब्यात घेतले. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान नागेश कानडे आणि दीपालीचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांना आठ वर्षाचा एक मुलगाही आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.