DPT NEWS NETWORK 🗞️. ✍️ प्रतिनिधी : दिप्ती पाटील
उरण :– रयत शिक्षण संस्थेचे,तुकाराम हरी वाजेकर विद्यालय फुंडे, उरण येथे शनिवार दि.४ फेब्रुवारी २०२३ रोजी न्हावा शेवा पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्ती जनजागृती अभियान, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
विद्यालयातील इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सदर मार्गदर्शन करण्यात आले.नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रसंगी कनिष्का नाईक-महिला पोलीस हवालदार यांनी सायबर क्राईम आणि त्याबाबतीत घ्यावयाची सुरक्षा याबद्दल सखोल माहिती दिली.प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मोबाईलच्या अति आहारी गेल्याने घडणारे गुन्हे आणि त्याचे परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच त्यांच्या ऑनलाइन पोर्टल विषयी माहिती दिली जेणेकरून त्यावरून आपण मदत मिळवू शकतो . तर अश्विनी कांबळे-प्रोबेशनल पोलीस उपनिरीक्षक यांनी महिला सुरक्षा याविषयी माहिती सांगत लैंगिक अत्याचार, त्याबाबतीत घ्यावयाची काळजी आणि कायदे याचीही माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
त्यानंतर पी.व्ही.गावित -पोलीस नाईक यांनी नशामुक्ती यावर मार्गदर्शन केले.कोणत्याही गोष्टीच्या अति सेवनाने किंवा अति आहारी गेल्याने त्याच व्यसन जडत आणि त्यात माणूस गुरफटला जातो, बरबाद होतो , विशेषतः युवा पिढी अधिक नशा करते. याबाबतीत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.एस.जी. वर्तक, जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री.एस.डी. म्हात्रे , श्री.नाईक एस. डी.आणि इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.