DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – प्रवीण चव्हाण
नंदुरबार-येथील धुळे रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरावरील शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला अभिवादन प्रसंगी नागरीक पुतळ्याच्या चौथर्यावर चढून माल्यार्पण करतात. अशावेळी पुतळ्याची होवू नये म्हणून पुतळ्याला लागून तात्पुरत्या स्वरुपात सिडी बसविण्यात यावी, अशी मागणी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन नंदुरबार येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आणि नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकार्यांना देण्यात आले.
ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील एलआयसी ऑफीस समोर भव्यदिव्य नाट्य मंदिर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा आहे. या ठिकाणी जयंती व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात पुष्पार्पण तसेच माल्यार्पण प्रसंगी कोणत्याही प्रकारची सिडीची सोय नाही. अशावेळी नागरीक पुतळ्याच्या चौथर्यावर चढून पुष्पार्पण तसेच माल्यार्पण करताना दिसून येतात. अशावेळी पुतळ्याचा विटंबना झाल्याची भावना मनात येते. याप्रकरणी अनेकवेळा निवेदन दिलेली आहेत. सदर पुतळ्याजवळ कार्यक्रम प्रसंगी पूर्णदिवस नगरपालिकेच्या कर्मचार्याची नियुक्ती करण्यात येवून तात्पुरत्या स्वरुपाची सिडीची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरुन पुतळ्याची कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही. येत्या दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यापूर्वीच सदर प्रकाराची दखल घेवून सिडी बसविण्यात यावी, अन्यथा ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेप्रसंगी भारतीय जनहित कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद मुख्तार अहमद, जिल्हा सचिव साहेबराव गावीत, तालुकाध्यक्ष गणेश ठाकरे, फाऊंडेशनचे सचिव दानिश बागवान, सामाजिक कार्यकर्ते तौफीक पठाण, न्हानू मालचे, देविदास ठाकरे आदी उपस्थित होते.