DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी: प्रभू तडवी
अक्कलकुवा: अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथील ग्रामसभेत बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून तशा पद्धतीने कोणी बालविवाह केला तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच राजू तडवी यांनी सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथे आज सरपंच राजू तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. गावात प्रथमच तीस ते पस्तीस वर्षानंतर मंडप लावून ग्रामसभा घेण्यात आली व घरोघरी अजेंडे व दवंडी देऊन लोकांना ग्रामसभेसाठी येण्यास प्रोत्साहित करण्यात आले होते .सदर ग्रामसभेला गावातील दीडशे ते दोनशे गावकरी उपस्थित असल्याचे सरपंच राजू तडवी यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक गणेश वसावे यांनी अहवाल वाचन व इतर प्रशासकीय बाबींची माहिती दिली. तर तलाठी मोहिते यांनी शेती संदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. बालविवाह अतिशय गंभीर सामाजिक समस्या असून अलीकडे बालविवाहाचे प्रमाण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. हे रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न केले जाणार असून जर अशा प्रकारे कोणी बालविवाह केल्याचे आढळून आले तर ग्रामपंचायत मार्फत संबंधित वधू-वर मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच गावातील रस्ते, आरोग्य, घरकुल, पाणीपुरवठा, शिक्षण, गटारी या विकासाची कामे देखील केले जातील.
यावेळी उपसरपंच सरदार तडवी व सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन सूर्यवंशी, दीपक पाडवी ,आकाश तडवी यांनी परिश्रम घेतले.