लग्नाच्या चार दिवसाआधीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू बोरद येथील घटना गाव बंद करुन वाहिली श्रद्धांजली
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- रविंद्र गवळे
नंदुरबार – तळोदा तालुक्यातील बोरद येथील एका तरुणाचा लग्नाच्या चार दिवसाआधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.बोरद येथील तरुण व मॉडर्न इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी चेतन (किसन) कोळी (वय 22) याचा विवाह दि.29 मे 2023 रोजी घटिक मुहूर्तावर शिंदखेडा येथील राजेंद्र श्रावण निकुंभ यांची कन्या दिपाली हिच्याशी निश्चित करण्यात आला होता. तो अहमदाबाद (गुजरात) याठिकाणी नोकरीला होता. लग्नानिमित्त काही दिवसांच्या रजेवर तो घरी आपल्या बोरद या गावी परतला होता. लग्नाचा उत्साह असल्याने तो व घरचे सर्व सदस्य खुश होते. तो स्वतः लग्नाच्या पत्रिका गावात आनंदाने वाटप करत होता. प्रत्येकाला आग्रहाने आमंत्रित करीत होता.मात्र, दि.25 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजता तो बाथरूम मध्ये काहीतरी काम करीत असताना अचानक त्याची प्रकृती खराब झाली व तो खाली कोसळला. त्याचा आवाज झाल्याने जवळ असलेल्यांनी बाथरूममध्ये जाऊन बघितले असता, तो अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. घरची तसेच मित्रमंडळी त्याठिकाणी जमा झाली. त्याला शहादा येथे खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचे निश्चित झाले. परंतू काळाचा घाव एवढा मजबूत होता की, काळाने त्याला शहादापर्यंत देखील पोहचू दिले नाही.रस्त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.ही बातमी गावात वार्यासारखी पसरली. त्याच्या नातलागवर तसेच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला याबाबत गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देविदास गोपाळ शिरसाठ यांचा पुतण्या व कै. राजाराम गोपाळ शिरसाठ यांचा चेतन उर्फ किसन हा मुलगा होता. त्याच्या निधनाने संपूर्ण बोरद गाव बंद ठेवण्यात आले.ज्याच्या लग्नाला जाण्यास गावकरी उत्साहित होते. त्याच्या अंत्ययात्रेत गावकर्यांना जावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली. त्याच्या पश्चात आई, काका, काकू, तीन बहिणी, चुलत भाऊ, मेव्हणे असा परिवार आहे. त्याच्या काकांचा मुलगा निलेश याने अंत्यसंस्कार केले.