DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन (एरंडोल)/ अजगरभाई मुल्ला (मेहुनबारे)
एरंडोल :- कासोद्याकडून जळगाव कडे जाणाऱ्या MH.19.M.0751 या क्रमांकाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गाडीवर अचानक जीर्ण झालेले चिंचेचे झाड पडल्याने अपघातात गाडीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर वय ३६ वर्षे, व चालक अजय महाजन वय ३५ वर्ष दोघे राहणार जळगाव यांचा जागीच मृत्यु झाला. तर भरत नारायण जठरे वय ३८ वर्ष, निलेश प्रकाश सूर्यवंशी वय ३७ वर्ष, चंद्रकांत सिताराम शिंदे वय ५८ वर्ष हे तिघे गंभीर जखमी झाले ही घटना गुरुवारी रात्री एरंडोल कासोदा रस्त्यावर एरंडोल पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर अंजनी धरण परिसरात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व त्यांचे सहकारी निलेश सूर्यवंशी चालक अजय महाजन, चंद्रकांत शिंदे व भरत जठरे हे चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे तपास कामासाठी गेले होते. ते परत जळगाव कडे जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी रस्त्या वरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील हे जात होते यांनी अपघाताची माहिती पोलीस स्टेशनला कळवली. तात्काळ लगेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आयरे, हवलदार अनिल पाटील, मिलिंद कुमावत, प्रशांत पाटील यांचे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच कासोदा पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले.
त्यावेळी बचाव कार्यास मदत करणारे एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, शैलेश चौधरी, विकी खोकरे, सिद्धार्थ परदेशी, अमरीश परदेशी, शिवसेनेचे वासुदेव पाटील, विकास संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी यांच्यासह आदी नागरिकांनी वाहनाच्या काचा फोडून जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. व प्रथमोपचार करून जखमी पोलिसांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले.
आर्थिक गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात झाल्याचे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम रामकुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदनवारकर यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केली.