DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संतोष जाधव
बारामती :- जिल्ह्यातील महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नुकताच निकाल समोर आला याबाबत मिळालेली माहिती अशी की, सक्सेस ग्रूपच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणाऱ्या मंदाराणी शिवाजी ढमढेरे व शिवाजी तुकाराम ढमढेरे या दांपत्याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश जे. ए. शेख यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. २०१९ मध्ये हा प्रकार उघडकीस झाला होता. या दांपत्याने जिल्ह्यातील महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. बारामती तालुका पोलिस ठाण्यात ढमढेरे दांपत्याविरोधात फसवणूकीसह एमपीआयडी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिसा आस्लम शेख यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणी एकूण सातजणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सक्सेस ग्रूप स्थापन करत त्या अंतर्गत या सात जणांनी श्री. महालक्ष्मी नारायण महिला महासंघ, पुणे ही संस्था स्थापन केली होती. त्या अंतर्गत महिलांना वेगवेगळी आश्वासने व अमिषे दाखवण्यात आली. महिला सबलीकरणाच्या नावाखाली महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले. प्रत्येक महिला सभासदांकडून दरमहा २०० रुपये बचत रक्कम स्विकारली जात होती. सलग १२ महिने रक्कम भरल्यास त्यावर १२ टक्के व्याज दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. महिलेने प्रतिवर्षी २४०० रुपये भरल्यास तिला २६८८ रुपये मिळणार होते. या गटाच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक महिलांचे पैसे गोळा केले गेले. परंतु त्यांची मुद्दल व व्याज परत केले नाही. याशिवाय शिवजीत मुद्रा को-आप क्रेडीट सोसायटीचे ११०० रुपयांचे शेअर्स घेतल्यास शेअर्स होल्डर्सला ३ महिन्याने १० हजार रुपये दिले जातील असे अमिष दाखवण्यात आले होते. ही शेअर्सची रक्कम स्विकारून परतावा दिलेली नव्हता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकाल ठराविक मुदतीत देण्याचे आदेश देण्यात आले होते.
सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे यांनी या खटल्यात २० जणांच्या साक्षी घेतल्या. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने मंदाराणी शिवाजी ढमढेरे व शिवाजी तुकाराम ढमढेरे या दोघांना एमपीआयडी अॅक्टनुसार दोषी धरत ६ वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. फसवणूकीच्या कलमान्वये सात वर्षे सश्रम कारावास व १५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास २१ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक बी. बी. जाधव, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलिस निरीक्षक युवराज मोहिते, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी काम पाहिले. सहाय्यक फौजदार संदीप घारे, पोलिस हवालदार संतोष शिंदे यांचे त्यांना सहकार्य झाले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार नामदेव नलवडे, अभिमन्यू कवडे यांनी काम पाहिले.