DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: साक्री शहरातील पांडव लॉन्स येथे शनिवार दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई येथील अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्टच्या अंध दिव्यांग कलावंताचा चेतना मेलडी आर्केस्ट्राचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व साक्रीकर रसिकांनी या कलावंताच्या कलेला यथाशक्ती आर्थिक मदत करून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंधदिव्यांग कलावंत व या कार्यक्रमाचे संयोजक तात्या पानपाटील यांनी केले आहे.
साक्री येथे पत्रकारांना याविषयी माहिती देतांना तात्या पानपाटील यांनी सांगितले की, सदर आर्केस्ट्रात सर्व गायक-वादक कलावंत अंध असून संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध शहरात गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे कार्यक्रम सादर होत असतात. कार्यक्रमास जाहिर तिकिट न लावता स्थानिक नागरिक कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या आर्थिक मदत व सहकार्यानिच सर्व आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून येणाऱ्या उत्पन्नातून सर्व बेरोजगार अंध अपंगाना आवश्यक त्यावेळी आर्थिक मदत केली जाते. अंध कलावंतांच्या कलेला वाव मिळावा व या माध्यमातून सर्व अंध कलावंत कार्यकर्ते यांना आर्थिक मदत करता यावी, या उद्देशानेच सदर ट्रस्ट कार्य करते, असेही पानपाटील यांनी याप्रसंगी सांगितले. साकी शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक कर्मचारी, शिक्षक लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनीसुद्धा या कार्यक्रमासाठी मोठे सहकार्य केले आहे. पांडव लॉन्सचे मालक भुषण बागुल यांनी यासाठी मोफत लॉन्स उपलब्ध करून दिले आहे. तर कार्यक्रमाच्या नंतर कलावंताच्या भोजनाची व्यवस्था साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघाने केली आहे. शहरातील उद्योजक व स्टॅम्प वेंडर शशिकांत ऊर्फ बंटी कायस्थ व रावसाहेब कांबळे यांचेही विशेष सहकार्य लाभत असल्याचे पानपाटील यांनी कृतज्ञतेने नमुद केले. तरी साक्री शहरातील नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन सर्व अंध कलावंतांना ऐच्छिकपणे आर्थिक मदत करावी असे आवाहन तात्या पानपाटील यांनी केली आहे. याप्रसंगी साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व प्रतिनिधी पत्रकार उपस्थित होते.