ड्रग्ज तस्कर ललित पाटील करणार गौप्यस्फोट
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिक :- ड्रग्ज तस्कर ललित पाटील चेन्नईमध्ये पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. पुण्यातून पळालेल्या ललित पाटीलने नाशिकमध्ये काही दिवस मुक्काम ठोकल्यानंतर व्हाया गुजरात दक्षिणेकडे गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ललितला नाशिकमध्ये कोणी आश्रय दिला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
‘एमडी’ या अती घातक व महागड्या ड्रग्जचे उत्पादन करून राज्यात विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील १५ दिवसांनी बुधवारी चेन्नईत मुंबई पोलिसांच्या हाती लागला. तिथे पोलीस पथक त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडील कँमेऱ्यांनी ललित पाटील याने दिलेला गर्भित इशारा टिपला आहे. “मी ससून मधून पळून गेलेलो नाही. मला पळवण्यात आले. कोणाकोणाचा हात आहे, मी सर्व सांगणार आहे. पत्रकारांशी बोलेन”, असा इशारा त्याने दिला आहे.
दरम्यान, पुण्यातून पळाल्यानंतर ललित पाटील नाशिकमध्ये आला होता. काही दिवस तो नाशिकमध्येच होता. तिथून तो गुजरात व त्यानंतर कर्नाटकमध्ये गेल्याचे पुढे येत आहे. नाशिकमध्ये ललित व भूषण या पाटील बंधूंच्या ड्रग्ज कारखान्याचा साकीनाका पोलिसांनी उलगडा केल्यानंतर आता ललितच्या वास्तव्याबाबतची माहिती पुढे येत असल्याने नाशिक पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकमध्ये तो कुठे लपला होता, त्याला कोणी मदत केली याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.