सुटेकेसाठी मागीतली होती 10 लाख रुपयांची खंडणी…
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण
नंदुरबार-: जिल्ह्यात लग्नासाठी मुलगी दाखवण्याचे आमिष दाखवून एका गुजरातमधील युवकाचे अपहरण करण्यात आले.
मात्र, वेळीच कारवाई केल्याने पोलिसांनी 7 जणांना अटक केली.
सुरत येथील किरणभाई रामजीभाई देसाई (28 ) व्यवसाय-मजुरी रा. रुम नंबर 213, कापुद्रा पोलीस ठाण्याच्या मागे, कृष्णा नगर, सुरत गुजरात राज्य हे गायी पाळून त्यांच्या पासून मिळणारे दुध विकून उदरनिर्वाह करतात.
त्यांचे लग्नाचे वय झाल्यामुळे त्यांचे नातेवाईक मोहनभाई रबारी रा. तापी यांनी चार ते पाच दिवसापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील रविभाई रा. शहादा जि. नंदुरबार यांचेशी संपर्क करुन लग्नासाठी स्थळ बघण्याबाबत सांगितले होते.
त्यानुसार रविभाई रा. शहादा यांनी चांगले स्थळ बघून लग्न जमवून देतो असे सांगितले.
त्यानंतर रविभाई रा. शहादा यांनी किरणभाई देसाई यांना व्हॉट्सऍ़प वर काही मुलींचे फोटो दाखविले.
फोटोतील एक मुलगी किरणभाई देसाई यांना पसंत पडल्याने त्यांनी प्रकाशा ता. शहादा येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत स्थळ बघण्यासाठी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी जाण्याचे ठरविले.
18 ऑक्टोबर रोजी दुपारी 03.30 वा. सुमारास किरणभाई देसाई हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत मुलगी बघण्यासाठी प्रकाशा ता. शहादा येथे पोहोचले तेव्हा मुलगी दाखविणारे रविभाई रा. शहादा हे त्यांना भेटले व तेथे लग्नासाठी दोन मुलींचे स्थळ दाखविले, परंतु चार ते पाच दिवसापूर्वी व्हॉट्सऍ़प वर लग्नासाठी दाखविलेल्या स्थळातील मुलींचे फोटो व प्रत्यक्ष दाखविले स्थळ हे वेगळे असल्याचे किरणभाई देसाई यांना लक्षात आले म्हणून त्यांनी व्हॉट्सऍ़पवर दाखविलेल्या फोटोतील स्थळाबाबत विचारपूस केली असता त्यांचे दोन दिवसापूर्वीच लग्न जमले या बाबत रविभाई रा. शहादा यांनी सांगितले. त्यानंतर किरणभाई देसाई यांनी स्थळ बघण्यासाठी नकार देवून घरी जाण्यासाठी निघाले.
तेव्हा रविभाई रा. शहादा यांनी स्थळ पाहण्यासाठी आणलेल्या दोन मुलींना नंदुरबार येथे सोडून देणे बाबत विनंती केली.
किरणभाई देसाई हे घरी जाण्यासाठी निघाले असता नंदुरबार शहराच्या अलीकडे वाहनातील दोन मुलींपैकी एका मुलीने प्रकृती बरी नसल्याचा बनाव करुन वाहन थांबविण्यास सांगितले.
वाहन चालकाने वाहन थांबविताच तेथे 30 ते 35 वर्षे वयो गटातील 7 इसम आले व दमदाटी करुन त्यांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात घेवून गेले व स्थळ पाहण्यासाठी आलेल्या इसमांचे मोबाईल जबरीने हिसकावून घेतले व सुटका करण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणीची मागणी करु लागले.
त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वाहन तेथून जात असतांना पोलीसांना काही तरी संशयास्पद प्रकार असल्याचे समजले, म्हणून पोलीसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता संशयीत इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लागलीच पोलीसांनी पाठलाग करुन 04 इसमांना ताब्यात घेतले व नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे आणले.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे निलेश गायकवाड यांनी घटने बाबत सविस्तर माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे सुचने नुसार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेला प्रकार समजून घेतला.
घटना अतिशय गंभीर स्वरुपाची होती म्हणून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीतांना अटक करुन जबरीने हिसकावून नेलेले मोबाईल व रोख रुपये हस्तगत करुन आरोपीतांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश केले.
दरम्यान किरणभाई रामजीभाई देसाई यांचे फिर्यादी वरून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं.328/2023 भा.द.वि. कलम 395,120(ब),384,385, 364(अ),504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले संशयीत आरोपीतांकडून उर्वरीत आरोपीतांबाबत सविस्तर माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणावरुन 3 महिला आरोपी व 4 पुरुष आरोपी असे एकूण 7 आरोपीतांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
साईनाथ उदयसिंग ठाकरे रा. धमडाई ता.जि. नंदुरबार.
नितेश नथ्थु वळवी रा. कोळदा ता.जि. नंदुरबार.
रणजित सुभाष ठाकरे रा. कोळदा ता.जि. नंदुरबार.
विशाल शैलेंद्र लहाने रा. नंदुरबार व 3 महिला यांना ताब्यात घेवून गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.
तसेच उर्वरीत आरोपीतांना देखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदर ची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी केली आहे.
अपहरण करुन सुटके साठी 10 लाख रुपयांची खंडणी सारख्या गंभीर स्वरुपाचा गुन्ह्यातील आरोपीतांना अवघ्या काही तासातच ताब्यात घेणाऱ्या पथकांचे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अभिनंदन करुन रोख बक्षिस देखील जाहिर केले आहे.