नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दर्शन पोलीस टाइम
संपादकीय…………..
दि. 01/01/2024
अपेक्षांचे नववर्ष……



आपला भविष्यकाळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा यासाठी नववर्षासारखा सुयोग्य असा दुसरा दिवस असू शकत नाही म्हणून हा लेखन प्रपंच!

२०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक ही या वर्षातील महत्त्वाची घडामोड असेल. तेव्हा २०२४ या वर्षाच्या आगमनाचे स्वागत करतांना त्याविषयी चर्चा होणे ओघाने आलेच. शिवाय राजकीय परिस्थिती जैसे थे राहिली तर त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका असतील. त्यामुळे हे वर्ष तसे महाराष्ट्राच्या दृष्टीने धामधुमीचे वर्ष आहे. तूर्तास निवडणुका जरी बाजूला ठेवल्या तरी त्या अनुषंगाने पुढे कुठली महत्त्वाची आव्हाने आपल्यापुढे आहेत याचा उहापोह आपल्याला २०२४ चे महत्त्व लक्षात आणून देणारा ठरेल.

देशभरात निवडणुकीचे कल पाहिले तर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतो असे नक्कीच म्हणता येते मात्र निवडणुकांचा निकाल बदलण्यासाठी फार काळ लागत नाही. सरासरी १० दिवस सुद्धा निवडणुकीचे निकाल फिरवण्यास पुरेसे असतात. तेव्हा कुठला पक्ष सत्तेत येईल हे भाकीत करण्याचा काही इथे उद्देश नाही. परंतु कुठलाही पक्ष सत्तेत आला तरी देशापुढील आव्हाने जी असणार आहेत ती कायम आहेत आणि त्यातून मार्ग काढणे सत्ताधाऱ्यांना क्रमप्राप्त आहे. तेव्हा कोण सत्ता मिळवत आहे हे गौण आहे तर त्यांच्यापुढील आव्हाने काय आहेत हे इथे सांगणे औचित्याचे आहे.

१९९२ साली भारताने तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वात आणि तत्कालीन अर्थमंत्री आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या कौशल्याने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यानंतर अनेक सरकारं आली आणि गेली. त्यापैकी काही औटघटकेची ठरली. मात्र तिथून पुढे भारताचे आर्थिक धोरण समान राहिले. मग कुठलाही पक्ष सत्तेत असो. जसे हे आर्थिक बाबतीत झाले तसेच परराष्ट्र धोरण आणि संरक्षण क्षेत्राचे सांगता येईल. सरकारं कुठल्याही पक्षाची असली तरी धोरण सातत्य कायम राहिले. तेव्हा आपण जर २०२४ या वर्षाचा आणि पुढील आव्हानांचा विचार करतो तेव्हा वरील आर्थिक, परराष्ट्र धोरण आणि संरक्षण या मुद्द्यांमध्ये आधीप्रमाणेच धोरणाच्या बाबतीत स्थैर्य असेल असे म्हणता येते.

मग आव्हानं कुठे आहेत तर शिक्षण, रोजगार आणि आरोग्य हे तीन क्षेत्र असे आहेत की आपल्याला या क्षेत्रांमध्ये असलेल्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत. नाहीतर आधी महासत्ता आणि आता ज्याला आपण ‘अमृतकाळ’ म्हणतो ते स्वप्न म्हणजे एक मृगजळ ठरेल. आपल्या देशाची शिक्षणाची परिस्थिती फार काही बरी नाही यासाठी कुठल्या अभ्यासकाच्या दाखल्यांची गरज नाही. प्राथमिक शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि उच्च शिक्षणाची भारतात होणारी हेळसांड बघितली तरी ते आपोआप लक्षात येते. एक तर खाजगीकरणामुळे शिक्षण महाग झाल्याने एका वर्गाची मक्तेदारी होऊन बसले आहे. जर आपण ही कोंडी फोडू शकलो नाही तर आपले वर्तमान दुख:दायक असेल तर भविष्य अंधकारमय झालेले असेल. इतका हा संवेदनशील प्रश्न आहे.

रोजगार हा प्रश्न आता खूप दाहक बनला आहे. शिक्षणाची गुणवत्ता पातळ करून आपण लोकांना साक्षर तर बनवले परंतु आता त्यांना द्यायला आपल्याकडे रोजगार नाही ही आपली दुखरी नस झालेली आहे. तरुण तरुणींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकऱ्या नाही तर दुसरीकडे उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये या तरुणांकडे नाही अशी विचित्र परिस्थिती आपल्या देशात आहे. याकडे अनेकांनी लक्ष वेधले तरी कुठल्याही सत्ताधाऱ्यांना याबाबतीत फारसे काही करता आलेले नाही. त्यामुळे आता हा प्रश्न एक ज्वलंत मुद्दा होऊन बसलेला आहे. जर आपण सर्वसमावेशक धोरण याबाबतीत आखू शकलो नाही तर एक मोठा आगडोंब उफाळू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना याची छोटी छोटी प्रारूपे आपण विविध आंदोलनाच्या माध्यमांतून बघतोच आहोत.

आरोग्य हा मुद्दा देखील असाच अजून एक कळीचा मुद्दा आहे. कोविड च्या धक्क्यातून अद्याप आपण पुरेसे सावरलो नाही. आता लोकांची जीवनशैली बदलली तशी आरोग्य ही संकल्पना आता नवनवीन घटकांसह आपल्यापुढे येते आहे. तेव्हा पारंपारिक आरोग्य व्यवस्था आधीच पुरेशी पडत नव्हती ती आता कालबाह्य ठरण्याचा धोका आहे. एकीकडे नवे आजार भयानक रूप धारण करत आहे तर दुसरीकडे त्या आजारांवर नियंत्रण मिळवणे तितकेच खर्चिक होतांना दिसते आहे. परिणामी आरोग्यव्यवस्थेचे सुदृढ जाळे जर आपण उभे केले नाही तर ज्या मनुष्यबळाच्या आपण गप्पा मारतो तेच जर ठणठणीत नसेल तर काय उपयोग? म्हणून आरोग्य व्यवस्था म्हणजे केवळ डॉक्टर्स नव्हे तर इतर सहयोगी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग त्याचबरोबर औषध निर्माण कंपन्या, प्रयोगशाळा यांसह पूरक व्यवस्था जी आपण आजवर सक्षमपणे उभारू शकलो नाही ती उभारायचे कठीण आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे.

आज आपण तरुणांचा देश असलो तरी त्या तरुणांना द्यायला दर्जेदार शिक्षण आपल्याकडे नाही, त्यांना रोजगाराची मोठी समस्या भेडसावत आहे शिवाय चांगले आरोग्य असण्यासाठीच्या सुविधा आपल्याकडे नाही अशावेळी आपण आपल्यात असलेले शक्तिस्थान गमावत आहोत. भविष्यात आपला तरुण देश म्हातारा होईल तेव्हा ही परिस्थिती अजून भयानक होईल. आज आपल्याकडे आव्ह्नांचा सामना करण्यासाठी पुरेसे सक्षम हात आहेत ते जर भविष्यात कमी झाले तर तेव्हा आपण काय करणार. आपल्या देशाची असलेली अवाढव्य लोकसंख्या पाहता ही आव्हानं किती मोठी आहेत हे पण आपण लक्षात घ्यायला आहे.

तेव्हा २०२४ मध्ये आपल्या देशासाठी आपण अनेक उपलब्धी साध्य केल्या आहेत यांत शंका नाही मात्र तरी या तीन कळीच्या बाबी आपण टाळून पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा आपला भविष्यकाळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा यासाठी नववर्षासारखा सुयोग्य असा दुसरा दिवस असू शकत नाही म्हणून हा लेखन प्रपंच! नवीन वर्ष आमच्या वाचकांना, जाहिरातदारांना, वितरक आणि सर्व प्रतिनिधी आणि सहकाऱ्यांना आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो या दर्शन पोलिस टाईम तर्फे शुभेच्छा!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
2:37 pm, January 21, 2025
temperature icon 30°C
साफ आकाश
Humidity 22 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:09 am
Sunset: 6:13 pm
Translate »
error: Content is protected !!