DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी– प्रा. नागेंद्र जाधव/संदिप सकट
चंदगड :- हुंड्यासाठी नवविवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी, सासरच्या मंडळींच्या जाचाला, छळाला कंटाळून राजगोळी बुद्रुक ता. चंदगड येथील सौ. निकिता हणमंत पाटील या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत दुर्दैवी मुलीच्या वडिलांनी चंदगड पोलिसात सासरचे पती, सासू, सासरे, नणंद व तिचा पती याविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
निकिता हणमंत पाटील वय २१, ही मूळची सुरुते ता. चंदगड गावची असून तिचा राजगोळी बुद्रुक येथील हणमंत धाकलू पाटील यांच्याशी गेल्यावर्षी मे महिन्यांत विवाह झाला होता. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून कायम तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जायचा, बुलेट गाडी घेण्यासाठी १ लाख रू, तसेच दिवाळी सणाला माहेरहून अंगठी, पेहराव केला नाही या कारणावरून तिचा जाच, छळ, केला जायचा. त्याला कंटाळून सोमवारी निकिताने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व तिच्या मरणास कारणीभूत ठरले प्रकरणी पती हणमंत धाकलू पाटील, सासू बाळाबाई धाकलू पाटील, सासरा धाकलू कल्लापा पाटील सर्वजण रा. राजगोळी बुद्रुक, नणंद चंद्रभागा रामा कोकितकर, तिचा पती नागोजी कोकितकर रा. मंगुत्ती ता. हुक्केरी बेळगाव यांच्याविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूस सासरच्या मंडळींना जबाबदार धरून निकिताचे वडील गजानन रघुनाथ पाटील यांनी चंदगड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरा, नणंद व तिचा पती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.