DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
जयसिंगपूर:- चारित्र्याच्या संशयावरून पत्नी तसेच सासू, मेव्हणा आणि मेव्हणीचा खून करणाऱ्या प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ४०, रा. कवठेगुलंद ता. शिरोळ, सध्या रा. शिरगांवे मळा, पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे, यड्राव) याला फाशीची शिक्षा व दहा हजार दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी शिक्षा सुनावली.
यड्राव (ता. शिरोळ) येथे सहा ऑक्टोबर २०१८ रोजी पहाटे पत्नी रूपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रदीप जगतापने भांडण काढले. त्यानंतर त्याने मागाच्या लाकडी माऱ्याचे प्रहार करीत पत्नीसह सासू, मेव्हणी, मेव्हणा या चौघांचा खून केला होता. सरकार पक्षातर्फे २४ साक्षीदार तपासल्यानंतर दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने व एकच वेळी चार व्यक्तींचा खून झाल्याने आरोपी प्रदीप जगतापला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व दहा हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास एक वर्षाची सक्तमजुरी अशीही त्यात तरतूद आहे.
जगतापच्या हल्ल्यात पत्नी रूपाली, सासू छाया श्रीपती आयरेकर, मेव्हणी सोनाली रावण, मेव्हणा रोहित श्रीपती आयरेकर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा शहापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन प्रभारी पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी प्राथमिक तपास केला. त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. हारुगडे यांनी पुढील तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांच्यासमोर चालविण्यात आला. सरकारी वकील म्हणून विद्याधर सरदेसाई यांनी काम पाहिले.
न्यायालयासमोर सरकार पक्षातर्फे साक्षीदार म्हणून पंच राहुल तात्यासाहेब परीट, वैशाली विजय पवार, शाम जनार्दन कांबळे, श्रीकांत कांबळे, संतोष गौड, मुख्य फिर्यादी अभिषेक श्रीपती आयरेकर, सुरक्षा रक्षक गुंडूराव पिराजी भोसले, पोलिसपाटील जगदीश संकपाळ, निवेदन पंचनाम्यावरील दुसरे पंच सुनील माने, फिर्यादीचे भाऊ रूपेश आयरेकर, आरोपीचा मित्र राजू मारुती गायकवाड, आरोपीची सावत्र मुलगी बाल साक्षीदार सानवी प्रदीप जगताप, घटनास्थळ पंच महादेव कांबळे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झुबेदा पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. महाडिक, डॉ. प्रभाकर पाटील, हेड कॉन्स्टेबल मारुती गवळी, पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या साक्षी घेण्यात आल्या.
साक्षीमध्ये बाल साक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सानवी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिने न्यायालयासमोर घडलेला प्रकार सांगितला. तिची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीच्या जप्त केलेल्या कपड्यांवर मृतांच्या रक्ताचे डाग होते. वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.