फसवणूक, गैरवर्तन व मारहाण केल्याची पत्नीची तक्रार
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
रामटेक :- शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन व प्राणीमित्र या संस्थेचे अध्यक्ष राहुल बबन कोठेकर यांचेवर रामटेक पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या पत्नीने त्यांचेवर फसवणूक मारहाण व गैरवर्तन केल्याप्रकरणी दि.५ एप्रिल २०२४ रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत रामटेक पोलिसांनी राहुल कोठेकर विरुद्ध भादंवीच्या २९४,३२३,४२७ व ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, राहुल कोठेकर हे येथील तहसील कार्यालयाजवळ राहतात. त्यांचे लग्न वाडी नागपूर येथील डॉक्टर मुलीशी रीतीरिवाजाप्रमाणे दि.२३ जून २०२३ रोजी पार पडले. लग्न झाल्यावर दोनच दिवसात राहुलने पत्नीस सांगितले की माझे यापूर्वी रामटेक येथील एका मुलीशी लग्न झालेले आहे व तुझ्याशी लग्न करुन मला पश्चात्ताप होत आहे. तु माझ्या घरुन निघून जा. त्यानंतर सातत्याने शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा आरोप पत्नीने आपल्या तक्रारीत केला आहे. पती राहुलचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते त्यामुळे आपण दि.२२/०१/ २०२४ ते ०६/०३/२०२४ पर्यंत माहेरी वाडी नागपूर येथे राहीलो व त्यांनंतर सासु बबीता कोठेकर यांनी समजूत घातली व रामटेक येथे मला आणले. मात्र त्यानंतरही पती राहुल आपल्याशी चांगला वागला नाही. दि.२ एप्रिल २०२४ ते ५ एप्रिल २०२४ या चार दिवसांत कुठल्या ना कुठल्या कारणावरून मला पती मारहाण व शिवीगाळ करीत होते. या सर्व पार्श्वभूमीवर शेवटी वडीलांना बोलावून घेतले. वडील,आई व भाऊ आपल्याला घेण्यासाठी आले असताना दि.५ एप्रिल २०२४ रोजी त्यांचे समोर शिवीगाळ व मारहाण केली. एवढेच नव्हे तर माझ्या वडीलांचे मोबाईल हिसकावून तोडफोड केले. अश्लील शिवीगाळ करीत माझ्या वडिलांना व भावाला बुक्क्यांनी मारहाण केली असा आरोप पिडीतेने तक्रारीत केला आहे.
—–> पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा संशय
या प्रकरणात आरोपी राहुलचे यापूर्वी रामटेक येथीलच एका मुलीशी लग्न झाले असून त्याबाबतचा पुरावा तक्रारीसोबत सादर करण्यात आलेला आहे. तरीही त्याच्यावर फसवणुकीचे कलम लावण्यात आले नाही. तसेच आरोपीस अटक तर सोडाच साधी चौकशीही करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने पोलीस त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना ? अशी शंका घेतली जात आहे.