प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा -: नंदूरबार ते प्रकाशा रस्त्यावरील तापी नदी पुलावर दि . २० रोजी ट्रॅक्टरचे दोन्ही चाके वर उचकावून स्टंट करणाऱ्या एकाविरूद्ध अखेर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदूरबार ते प्रकाशा रस्त्यावरील तापी नदी पुलावर दि . २० रोजी ऊसाने भरलेली ट्रॅक्टरट्रॉली ( क्र.एम.एच .१८ झेड ९ ५ ९ ० ) घेवून जात होता . यावेळी त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत क्षमते पेक्षा जास्त ऊस भरल्याने हायड्रोलिकचा पाटा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या दांड्याला लावल्यामुळे ट्रॅक्टरचे पुढील दोन्ही चाके वर उचकावून स्टंट केला . तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करुन वाहतूकीची कोंडी करीत धोकेदायक पद्धतीने ट्रॅक्टर चालवितांना आढळून आला . चालकाच्या या स्टंटमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता . तसेच ट्रॅक्टर नदीत कोसळून अथवा बाजूला कोसळून अपघाताची शक्यता देखील निर्माण झाली होती . त्यातच ट्रॅक्टर चालक स्टंट करत असल्याने अनेक वाहने पुलावरच थांबल्याने काही वेळ वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती . दरम्यान , सदर ट्रॅक्टर चालका बाबत माहिती देणाऱ्यास शहादा पोलिसांकडून बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते .
त्यानुसार दि . २३ रोजी ट्रॅक्टर चालका बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेवून पोहेकॉ . रामा वळवी यांच्या फिर्यादीवरुन संशयित तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथील राहूल संपत डोंगरे याच्याविरुद्ध भादंवि कलम २७ ९ सह मोटार वाहन कायदा कलम २२ ९ , १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाडवी करीत आहेत .