DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
नागपूर :- नागपूर तालुक्यासह, कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यात अनेक स्टोन क्रशर प्लॅन्ट (गिट्टीच्या खाणी) सुरु आहेत. त्यातील अनेक प्लॅन्ट विना परवाना सुरु असून प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आहे.
क्रशर प्लॅन्टच्या लीजची मुदत संपली असतांनाही विना परवाना प्लॅन्ट मधून गिट्टी, चुरी, डस्ट, व क्रशर सॅन्डचे उत्पादन केले जात आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या या गिट्टी खाणीत स्फ़ोटकांचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो. असे असतांना प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भिवापूर तालुक्यातील मांगरूळ, उमरेड तालुक्यातील गिरड मार्ग, पाचगाव, सालई मेंढा, चिमणाझरी, कुही तालुक्यातील कुही फाटा, सुरगाव तर नागपूर तालुक्यातील सालई या भागात अनेक स्टोन क्रशर प्लॅन्ट आहेत. एकट्या सालई परिसरात सहा ते सात प्लॅन्ट आहेत. त्यातील काहींनी परवाना एकीकडचा घेतला तर प्लॅन्ट दुसऱ्याच ठिकाणी चालवीत असल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारची चौकशी करण्याची गरज असून चौकशी झाल्यास मोठे गोडबंगाल उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
—> विविध जिल्ह्यात होतो पुरवठा
वैध अवैध प्रकारे सुरु असलेल्या क्रशर प्लॅन्ट मधून दररोज शेकडो ट्रक गिट्टी, चुरी, डस्ट, क्रशर सॅन्ड उत्पादीत करुन नागपूर,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यात वाहून नेली जाते. यातून प्लॅन्ट चालक कोट्यावधीचा व्यवसाय करीत आहेत.
—-> क्रशर प्लॅन्ट करीता आवश्यक असलेल्या बाबी
स्टोन क्रशिंग (स्क्रिनिंग) प्लॅन्टचा परवाना मिळविण्यासाठी काही आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागते. त्यात जियॉलॉजी आणी माईन्स युनिट कडून खान लीज, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र, शासनाने नियुक्त केलेल्या सल्लागार मंडळाने मंजूर केलेला प्रकल्प अहवाल आदीसह महसूल विभागाची परवानगी आदी प्रमुख आहेत. सुरु असलेल्या क्रशर प्लॅन्ट पैकी काही निवडक क्रशर चालकांनीच वरील बाबींची पूर्तता केली असल्याचे समजते. इतर प्लॅन्ट परवाना नसताना सुद्धा केवळ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे सुरु आहेत.