बावनथडीची वाळू खवासा – देवलापार मार्गे नागपुरात
प्रतिनिधी अमर मोकाशी
नागपूर :- मध्यप्रदेशच्या सिमेतील कोडबी घाटामधून मोठ्या प्रमाणात चोरीची वाळू खवासा, देवलापार मार्गे नागपूर, अमरावतीसह वेगवेगळ्या ठिकाणी नेली जात असल्याची माहिती आहे.
एकीकडे भिवापूर, उमरेड मार्गावर लागोपाठ कारवाई करुन पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर बव्हंशी आळा घातला, तरी दुसरीकडे देवलापार मार्गे सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरु असतांना पोलीस शांत आहेत. नागपूर (ग्रामीण) पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील वाळू तस्करांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या बावनथडी नदीकडे आपला मोर्चा वळवीला आहे. कोडबी घाटामधून वाळू भरून ती खवासा, देवलापार मार्गे कन्हान, कामठी, कळमेश्वर, काटोल, नागपूर आणी अमरावती येथे नेली जाते. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरु असतो. दररोज सत्तर ते अंशी ट्रक वाळू खवासा देवलापार मार्गे नागपूर आणी अन्य शहरात वाहून नेली जात आहे. यात सर्वाधिक ट्रक यादव गृपचे असल्याची माहिती आहे. यादव गृपचा या मार्गावर बोलबाला आहे. वेगवेगळ्या खात्यातील अधिकाऱ्यांशी त्यांची जवळीक असल्याचे समजते.
वाळू चोरीचा गोरखधंदा सुरळीत चालावा यासाठी पोलीस व महसूल विभागाला दर महिन्याला “एन्ट्री” रुपी चढावा चढवीला जात असल्याचे समजते. एका ट्रक मागे चढाव्याची राशी दोन लाखाच्या वर असून महिन्याला दिड कोटीपेक्षा अधिक राशी एन्ट्री च्या नावावर वाटली जाते. एन्ट्री जमा करुन ती अधिकाऱ्यांना पोहचविण्याचे काम ” यादव ” मंडली बघतात. ट्रक मालकाला रस्त्यात एखाद्या अधिकाऱ्याकडून काही त्रास झाल्यास तो एन्ट्री जमा करणाऱ्याशी संपर्क साधून होणारा त्रास दूर करतो.
—–> रॉयल्टीची खरेदी-विक्री ?
मध्यप्रदेशाच्या सीमेतील घाटामधून वाळू भरायची आणी रॉयल्टी मात्र महाराष्ट्राच्या सीमेतील घाटावरून घ्यायची. असाही गोरखधंदा येथे सुरु आहे. नावापूरती रॉयल्टी सोबत असावी, या उद्देशाने ट्रक मालक दोन ते चार हजार रुपये देऊन रॉयल्टी विकत घेतात. एक डेपो चालक निव्वळ रॉयल्टी विकण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. यातून त्याचे रोजचे लाखोचे वारे न्यारे होत असल्याचे समजते.
—–> वाळू तस्करीला नेत्यांचे पाठबळ ?
खवासा, देवलापार मार्गे सुरु असलेल्या वाळू तस्करीला काही राजकीय मंडळींचे आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. राजकीय पाठबळ असल्याने अधिकारी वर्ग वाळू तस्करांच्या विरोधात जाण्याचे धाडस करीत नाही. याच कारणाने वाळू चोरीचा गोरखधंदा जोमात सुरु असल्याचे समजते.
—-> एका मार्गावर बॅन तर अन्य मार्गावर मोकळे रान
वाळू वाहतुकीविरुद्ध नागपूर जिल्ह्यातील काही निवडक मार्गावर पोलीस कारवाई करतांना दिसते. मागील वर्षभराची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात सर्वाधिक वाळूच्या केसेस उमरेड भिवापूर मार्गावर झाल्याचे दिसून येईल. सततच्या पोलीस कारवाईने या मार्गावर चालणाऱ्या मोटार मालकांचे कंबरडे मोडले आहे. काम नसल्याने अनेकांनी त्यांची वाहने उभी करून ठेवलीत. काहींनी वाहने विकायला काढलीत तर काहींची वाहने फायनान्स कंपनीवाले घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. अशी बेकार अवस्था मोटार मालकांची झालेली आहे. त्यासाठी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध या मार्गावर पोलिसांनी घेतलेली कठोर भूमिका कारणीभूत आहे. मात्र एका मार्गावर वाळू वाहतुक बॅन तर दुसऱ्या मार्गावर वाळूच्या वाहकीला मोकळे रान असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. देवलापार मार्गाने फेरफटका मारला असता त्याचा प्रत्यय येतो. हे चित्र पोलीसांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवीणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
फोटो – नागपूरच्या दिशेने येण्यासाठी खवासा टोल नाक्याजवळ रांगेने उभे असलेले ओव्हरलोड वाळू भरलेले ट्रक