प्रती ब्रास दोन ते अडीज हजाराची अतिरिक्त वसुली
डेपोवर नियंत्रण ठेवणाऱ्या समित्या ठरल्या पांढरा हत्ती
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भंडारा :- वाळू लोडींगच्या नावावर एका ब्रास मागे दोन ते अडीज हजार रुपये अतिरिक्त वसुल करुन वाळू डेपो चालकांकडून मोटार मालक व सामान्य ग्राहकांची लूट केली जात आहे. या लुटीला महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे छुपे पाठबळ असल्याने डेपो चालकांचा हा गोरखधंदा जोरात सुरु आहे. त्याचा फटका वाळूच्या किंमतीवर होऊ लागला असून ग्राहकांना दुप्पट पैसे मोजून वाळू खरेदी करावी लागत आहे.
वाळूची तस्करी थांबावी व ग्राहकांना स्वस्त आणी हवी तेव्हा वाळू मिळावी यासाठी महसूल विभागाने मागील वर्षी नवे वाळू धोरण अमलात आणले. त्यानुसार नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास वाळू देण्याचे जाहीर केले. त्यासाठी शासनाच्या पोर्टलवर जाऊन ग्राहकांना वाळूची बुकिंग करायची आहे. बुकिंग केल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित वाळू डेपो मध्ये जाऊन वाळू घेऊन जावी लागते. वाळू वाहतुकीचा वेगळा खर्च ग्राहकाला करायचा आहे. असे हे नवे वाळू धोरण आहे. या नव्या धोरणामुळे 600 रुपये ब्रास वाळू मिळणार असा समज होऊन सर्वत्र आनंद व्यक्त केला गेला. मात्र हा आनंद औटघटकेचा ठरला. एका ब्रास करीता 600 रुपयांसोबत एसआई व वाळू डेपो व्यवस्थापन खर्चाचे 1200 ते 1300 रुपये त्यात जोडले गेले. हे सर्व मिळून बुकिंग करते वेळी एक ब्रास वाळूचे ग्राहकाला 2 हजार रुपयांच्या जवळपास ऑनलाईन भरावे लागतात. ही रक्कम भरल्यानंतर ग्राहकाला डेपोमधून वाळू आनायचा वाहतूक खर्च करायचा असतो. परंतु ग्राहक जेव्हा वाळूची उचल करण्यासाठी डेपो मध्ये जातो तेव्हा त्याला डेपो चालकाकडून लोडींगच्या नावावर प्रती ब्रास वाळूसाठी 2 ते अडीज हजार रुपयांची मागणी केली जाते. ही रक्कम दिली तरच ग्राहकाला वाळू दिली जाते अन्यथा वाळू दिली जात नाही. विशेष म्हणजे ही रक्कम रोख स्वरूपात घेतली जाते. ऑनलाईन घ्यायची झाल्यास डेपो चालक स्वतःच्या किंवा एजन्सी च्या खात्यावर न घेता ती दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवायला सांगतो. ही रक्कम डेपो चालकाची अतिरिक्त कमाई आहे.
——> वाळू डेपोवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर समित्या गठीत केल्या आहेत. मात्र लोडींगच्या नावाखाली डेपो चालक ग्राहकांची उघडपणे लूट करीत असतांना डेपोवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या समित्या कुठंच दिसत नाही.
डेपो चालक करीत असलेल्या लुटीत अधिकाऱ्यांची टक्केवारी असल्याचे समजते. या टक्केवारीच्या हव्यासापोटी त्यांनी ग्राहकांची लूट करायला डेपो चालकांना खुली सूट दिली असल्याच्या मोटार मालकांत चर्चा आहेत.
—-> पवनी तालुक्यातील शिवनाळा व गुडेगाव तसेच लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील डेपो मध्ये ग्राहकांची लूट होत असल्याची बाब समोर आली आहे. असे असले तरी जवळपास सर्वच वाळू डेपोमध्ये हा प्रकार सुरु आहे.
—-> ट्रक मालक कधी बुकिंग करुन तर कधी विना बुकिंगने डेपो मधून वाळू भरतात. बुकिंग असल्यास दोन ते अडीज आणी बुकिंग नसलेल्या ट्रक मालकाकडून प्रती ब्रास चार ते साडेचार हजार रुपये वसुल केले जाते. बुकिंग नसलेल्या ट्रक मालकाला डेपो चालक स्वतः त्याने आधीच बुकिंग केलेली रॉयल्टी देतो.
वरील दोन्ही प्रकारात डेपो मालक मोटार मालकांची लूट करीत आहेत. डेपो मधूनच वाळू चार ते साडेचार हजार रुपये ब्रास मिळत असल्याने मोटार मालकांना नाईलाजाने बाहेर ती चढ्या किमतीत विकावी लागते. यात सामान्य नागरिकांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागतो. यासाठी मुख्यत्वे डेपो चालक जबाबदार असून त्यांच्या या मनमानीला चाप लावण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.