DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर :- चंदगड कोवाड येथील 4 जानेवारी रोजी राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये मशीन फोडून 18 लाख 77 हजार तीनशे रुपये लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी पालघर जिल्ह्यातून अटक केली. चोरीतील रक्कम आपल्या साथीदारांकडे देऊन ते पालघर जिल्ह्यातील मनोर येथे लपले होते. यातील रक्कम घेऊन पळालेल्या त्यांचा साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लुटीच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण व चंदगड पोलिसांचे पथक संशयीतांच्या मागावर होते.
पोलिसांना सापडलेल्या कार मधील कागदपत्रावरून कार मालकाचा शोध घेतला असता त्यांच्याकडून कार घेऊन गेलेल्या चौघांची नावे मिळाली. चोरी करून पळालेले चौघे पालघर जिल्ह्यातील मनोरला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसलीम खान वय 20, अली शेर जमालोख खान वय 29, तालीम पप्पू खान वय 28, व अकरम शाबू खान वय 25 चौघे राहणार (सामादिका, तालुका पहाडी, जिल्हा भरतपुर राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयतांची नावे असून लुटीतील रक्कम घेऊन जाणाऱ्या सलीम खान, इस्त्रायल व अकबर यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या टोळीतील सलीम खान हा चंदगड परिसरात जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता.सदर आरोपी चंदगड पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत.