DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :- अग्निवीर कार्यशाळेसाठी आयोजित करण्यात आलेले प्रात्यक्षिक सत्र उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या सत्रामध्ये 48 महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल एस.के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनातून हवालदार हरप्रीत सिंग आणि हवालदार भगवान उगले या प्रशिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सैनिकी कौशल्य, शारीरिक क्षमता आणि मानसिक तयारीचे मार्गदर्शन केले.
सिताराम गोविंद पाटील महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्यातर्फे आयोजित व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सहकार्याने सहा दिवसीय “अग्नीवीर” सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण अभियान” कार्यशाळा संपन्न होत आहे. दुसऱ्या दिवसाच्या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील होते. प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. पंकज अहिरे, कार्यशाळेचे समन्वयक व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. भुषण अहिरराव, आयक्यूएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व युवती सभा अध्यक्षा डॉ. ज्योती वाकोडे उपस्थित होते.
सदर सत्रामध्ये शारीरिक चाचणी, धावणे, लष्करी व्यायाम प्रकार, तसेच सहनशक्ती वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. सत्रादरम्यान प्रशिक्षकांनी उमेदवारांना शिस्त, धैर्य आणि मनोबल वाढविण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या तसेच सैनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही कार्यशाळा नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि आगामी अग्निवीर भरतीसाठी उमेदवारांना नवी ऊर्जा व दिशा देईल असा विश्वासही व्यक्त केला.