DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- प्रा. भरत चव्हाण
तळोदा -: नंदुरबार येथील स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात पोहताना १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. बाम्हणे (ता. शिंदखेडा) येथील ललित सुधीर पाटील हा त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी आला असता तो पाण्यात बुडाला. नातेवाईकांनी जलतरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
सहकारी मित्रांसह नंदुरबारला आलेल्या ललितने तलावात पोहत असताना खोल पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी तो बुडू लागल्याचे मित्रांनी पाहून गार्डना माहिती दिली. मात्र, वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा जीव गेला, असा आरोप नातेवाईकांनी केला. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलता एक मुलगा गमावलेल्या कुटुंबीयांनी जलतरण तलावाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे.