प्रतिनिधी (नंदकुमार नामदास) कल्याण: महागड्या दुचाकी चोरून हौस मौज करणे एका गॅरेज मॅकेनिकला चांगलेच महागात पडले आहे. बुलेट चोरी प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या गॅरेज मॅकेनिकला अटक केली आहे. राज तावडे असं या चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या पाच दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी मॅकेनिक राज तावडेने आणखी बाईक चोरल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त करत पुढील तपास सुरू केला आहे.
डोंबिवली परिसरात दुचाकी चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकरणी पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. एका बुलेट चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना चोरी गेलेली बुलेट एक तरुण चालवत असताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. चोरट्याचं नाव राज तावडे असं असल्याचं समोर आलं.
आरोपी डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात राहत असल्याची माहिती डोंबिवली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ या भागातून आरोपी राज तावडे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. राज हा याच परिसरात एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला विना चावी गाड्यांचा हँडल लॉक कसे उघडायचे, गाडी कशी सुरू करायची याबाबत माहिती होती.
आपल्या मॅकेनिकल कौशल्याचा फायदा घेत आरोपीने गेल्या दोन महिन्यांपासून दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता. चोरी केलेल्या बाईक तो स्वतःच्या हौसेसाठी स्वतःच वापरत होता. चोरी केलेल्या काही बाईक त्याने मित्रांना वापरण्यासाठी दिल्या होत्या.
पोलिसांनी त्याच्याकडून आत्तापर्यंत पाच महागड्या बाईक हस्तगत केल्या आहेत. आरोपी राजने आणखी बाईक चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती डोंबिवली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश सानप यांनी दिली.